पुणे नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
सोमवार, 20 एप्रिल 2020 (09:11 IST)
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गनागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाल्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजवंताला घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
या भागातील मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही निवंगुणे म्हणाले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत नसल्याने व्यापाऱ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. दुकाने बंद राहणार असली तरी ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना घरपोच डिलीव्हरी दिली जाणार आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनाथ सोमसे, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, सुनिल गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.