म्युकर मायकोसिस: ऑक्सिजनवर आणि ICU मध्ये असणाऱ्यांना काळी बुरशीचा धोका का आहे?
शुक्रवार, 21 मे 2021 (19:19 IST)
मयांक भागवत
कोरोना संसर्गाच्या उपचारात स्टिरॉईडचा भरमसाठ वापर, अनियंत्रित मधुमेह आणि कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) संसर्गाची प्रमुख कारणं मानली जातात. त्याचसोबत, दीर्घकाळ ऑक्सिजन थेरपी आणि ICU मधील उपचार म्युकर मायकोसिसच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्र सरकारने म्युकर मायकोसिसमुळे होणाऱ्या या आजाराबाबत नवीन नियमावली जारी केलीये. या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे 800 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत, तर 90 रुग्णांचा मृत्यू झालाय, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सर्व राज्यांना म्युकर मायकोसिसचा साथीच्या आजारांमध्ये समावेश करण्याची सूचना केली आहे.
म्युकर मायकोसिस संसर्गासाठी हे घटक कारणीभूत ठरु शकतात?
कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर होणारा हा आजार अत्यंत दुर्मिळ मानला जातो.
हिंदुजा रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. आशित हेगडे सांगतात, "कोरोनापूर्वी अनियंत्रित मधुमेह असलेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, कोरोना काळात हा आजार तीनपटीने वाढलाय."
आरोग्य मंत्रालयाने काळी बुरशी संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांबाबत माहिती दिलीये.
ICU मध्ये दीर्घकाळ उपचार
बराच काळ सुरू असलेली 'ऑक्सिजन थेरपी', विशेषत: ट्युबमधून देण्यात येणारा ऑक्सिजन
रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणारी टोसिलोझुमॅब, इटोलिझुमॅबसारखी औषधं
मधुमेह आणि स्टिरॉईडचा अनियंत्रित वापर
व्हिरिकोनाझोल थेरपी (Voriconazole Therapy)
नाकावाटे नळीच्या मदतीने दिलं जाणारं अन्न (Ryles Tube feeding)
अवयव प्रत्यारोप केल्यानंतर निर्माण होणारी गुंतागुंत
दमट हवामानावर नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटली दुषित होणं (Humidifier)
खूप जास्त क्षमतेच्या अॅन्टीबायोटिक्सचा दीर्घकाळ वापर
आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणेच मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयातील इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. हनी सावला देखील ICU मधील रुग्णांसाठी वापरण्यात येणारी टोसिलोझुमॅब आणि इटोलिझुमॅब औषधांमुळे म्युकर मायकोसिसचा धोका वाढल्याचं सांगतात.
ऑक्सिजन-ICU मध्ये उपचार संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात?
तज्ज्ञ सांगतात, कोव्हिड-19 मध्ये मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा संसर्ग झालेल्यांना दीर्घकाळ ऑक्सिजन किंवा ICU मध्ये उपचार घ्यावे लागतात. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची ऑक्सिजनची मागणी वाढलीय.
केईएम रुग्णालयाच्या नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. नीलम साठे सांगतात, "ICU मधील एसी आणि थंड वातावरण व्हायरस आणि बुरशीसाठी पोषक आहेत."
गंभीर आजार रोगप्रतिकारशक्ती कमी होते. काहींचा मधुमेह अनियंत्रित असतो. या कारणांनी, संसर्ग पटकन होतो, असं तज्ज्ञांच मत आहे.
"ऑक्सिजन आणि ICUची उपकरणं वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. डिस्पोसेबल ऑक्सिजन मास्क हवेत. ऑक्सिजन ट्युबचं निर्जंतुकीकरण महत्त्वाचं आहे. प्राणवायू पुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये बुरशी असल्यास रुग्णांना इंन्फेक्शनची शक्यता असते," असं डॉ. साठे पुढे म्हणतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने, बुरशी नाकातील सायनसच्या पेशींवर (टिश्यू) हल्ला करते. त्यानंतर डोळे आणि मेंदूपर्यंत पसरते.
मुंबईच्या नाक-कान-घसा तज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय डोईफोडे सांगतात, "ऑक्सिजन थेरपीमुळे म्युकरचा त्रास होत नाही. पण ICU मध्ये ऑक्सिजन थेरपीसाठी ह्युमिडीफायरमध्ये सलाइन वॉटरचा वापर करण्यात यावा. नळाचं पाणी वापरू नये. जेणेकरून रुग्णांना दुषित पाण्यापासून इंन्फेक्शनचा धोका राहणार नाही."
डॉ. हनी सावला यांनी गेल्यावर्षभरात कोव्हिड रुग्णांवर उपचार केले आहेत. त्याचसोबत आता म्युकर मायकोसिस रुग्णांवरही उपचार करत आहेत.
त्या म्हणतात, "भीतीपोटी अनेक रुग्णांनी घरात गरज नसताना ऑक्सिजन घेण्यास सुरूवात केली. गरज नसताना ऑक्सिजन घेणं, म्युकर मायकोसिस वाढण्याचं कारण आहे."
"या रुग्णांचा मधुमेह अनियंत्रित असतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होणारी औषध सुरू असतात. अशावेळी एखादी दुषित गोष्ट शरीरात गेली. तर, म्युकर मायकोसिस आणि इतर बुरशीजन्य आजारांचा धोका असतो," असं डॉ. हनी सावला पुढे सांगतात.
काळ्या बुरशीवर प्रतिबंध कसा करायचा?
तज्ज्ञ सांगतात, काळी बुरशीचा रोगप्रतिकारसक्ती चांगली असलेल्या सामान्य व्यक्तीला त्रास होत नाही. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर हल्ल करतो.
राज्याच्या आरोग्य संचलनालयाने काळी बुरशी आजारावर प्रतिबंधासाठी 6 प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत -
ऑक्सिजन कमी असलेल्या रुग्णांवरच स्टिरॉईडचा वापर करावा
सामान्य ऑक्सिजन पातळी असलेल्यांना तोंडावाटे दिले जाणाऱ्या स्टिरॉईडचे दु:परिणाम होतात
स्टिरॉईड देताना मधुमेहावर नियंत्रण महत्त्वाचं
स्टिरॉईडचा डोस आणि काळ योग्य असावा. डेक्सामिथेसॉन (0.1 मिलिग्रॅम-दिवसाला) 5-10 दिवस
ऑक्सिजन थेरपीसाठी वापरण्यात येणारे ह्युमिडीफायर स्वच्छ करावेत. यात सलाइनचं पाणी वापरावं. मास्कचं निर्जंतुकीकरण महत्त्वाचं आहे
सार्वजनिक रुग्णालयातील प्रयोगशाळेत ह्युमिडीफायर, मास्क, ट्युब यांचे नमुने घेऊन तपासणी करावा
नाक-कान-घसा तज्ज्ञांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावं?
तज्ज्ञ सांगतात, म्युकरमायकॉसिस आजारात डोळे, नाक, जबडा आणि मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
रुग्णालयात दाखल होताना रुग्णाच्या रक्तातील सारखेचं प्रमाण 200 पेक्षा जास्त असेल, रुग्ण 7 दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजनवर असेल, ICU मधील उपचार 7 दिवसांपेक्षा जास्त असतील, 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड्सचा वापर करण्यात आला असेल, तसंच टोसिलोझुमॅबचा वापर रुग्णावर केला असल्यास रुग्णाकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
कोणती लक्षणं तपासण्याची गरज?
डोळे किंवा नाकाच्या बाजूला दुखणं किंवा लाल होणं
सौम्य ताप, डोकेदुखी, कफ
श्वास घेण्यास अडथळा
रक्ताची उलटी, नाकातून रक्त येणं
डोळ्यांजवळ सूज येणं
चेहऱ्याच्या एकाबाजूला दुखणं किंवा बधीर होणं
दात दुखणं किंवा चावताना त्रास होणं
आरोग्यमंत्रालयाने नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि डोळ्यांच्या डॉक्टरांना रुग्णांची पूर्ण तपासणी करण्याची सूचना दिली आहे.
'लोकांचं बरं-वाईट होण्याआधी कारवाई करा'
या आजारावर उपचारासाठी अॅम्फोटेरेसिन-B हे औषध अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत हेच औषध वापरण्यास सांगण्यात आलंय.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रुग्णाला एका दिवसात 6 इंजेक्शन लागतात. पण, रुग्णसंख्या वाढू लागल्याने औषधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय.
डॉ. ग्रिष्मा वडीलांसाठी अॅम्फोटेरेसिन-B औषधाच्या शोधात आहेत. मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात त्यांच्या वडीलांवर उपचार सुरू आहेत.
ट्वीटरवर लिहितात, "पाच दिवसांपासून रुग्णालयात औषधाचा साठा नाही. रुग्णांचं काही बरं-वाईट होण्याआधी सरकारने दखल द्यावी. प्रत्येक रुग्णाला साधारण: 8 इंजेक्शनची गरज आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यासाठी सांगितलं जात आहे."
हीच परिस्थिती राज्यात आणि देशात पहायला मिळतेय. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, "अॅम्फोटेरेसिन-B औषधाची सर्वात मोठी अडचण आहे. रुग्णाला आठवड्याला 60 के 100 इंजेक्शन लागतात." "आत्तापर्यंत मिळालेली आणि खरेदी करण्यात आलेली 16 इंजेक्शन सरकारने सर्व जिल्ह्यांना वाटली आहेत."