अजित पवार म्हणतात, 'म्युकरमायकोसिसचे पुण्यात 300 पेक्षा जास्त रुग्ण, इंजेक्शनची कमतरता'

शुक्रवार, 21 मे 2021 (16:10 IST)
पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुणे जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी) रुग्ण आहेत. यासंदर्भातल्या इंजेक्शनची कमतरता आहे, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
 
पुढच्या 10 दिवसात राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेणार, असंही ते म्हणाले.
 
लॉकडाऊनविषयी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन संपायला अजून 10 दिवस बाकी आहे. 10 दिवसांत काय होतं ते बघून पुढचा निर्णय घेऊ.
 
अजित पवार यांनी मांडलेले मुद्दे -
सध्या पुण्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा राहिलेला नाहीये. रेमडेसिव्हीर आणि प्लाझ्माविषयी आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
पुण्यात 300 पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी) रुग्ण आहेत. जिलह्यात बाहेरचे रुग्ण अॅडमिट आहेत. यासंदर्भातल्या इंजेक्शनची कमतरता आहे. कारण हा आजार झालेल्या व्यक्तीला दिवसाला 6 इंजेक्शन्स द्यावी लागतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला पहिले येणार होते. त्यांचा तसा कार्यक्रमही आला होता. मग ते गुजरातला जाणार होते. पण मग ते थेट गुजरातला गेले आणि त्यांनी पॅकेज जाहीर केलं.
भारतात गुजरात जसं एक राज्य आहे, तसंच महाराष्ट्रही एक राज्य आहे. गुजरातप्रमाणे इतर राज्यांना मदत जाहीर झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं.
कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, पण आलीच तर महाराष्ट्र सरकार सज्ज आहे. आम्ही तयारी केलीये.
तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका सांगितला जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सरकार विशेष काळजी घेत आहे.
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात.
 
कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
 
बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.
 
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.
 
कोव्हिड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकर मायकॉसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं हा आजार काय आहे, आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे.
 
काळ्या बुरशीचा फटका बसलेल्या रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील, याबाबत राज्य सरकारने काय म्हटले आहे हे देखील आपण पाहाणार आहोत. त्या आधी हा आजार नेमका काय आहे हे समजून घेऊ.
 
काय आहे 'म्युकर मायकॉसिस'?
राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झालीये.
 
मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, "सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे."
 
तज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. "ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते," असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.
 
'म्युकर मायकॉसिस' आजाराची लक्षणं?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
 
नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची प्रमुख लक्षणं सांगतात.
 
नाकातून रक्त येणं
मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते.
मधुमेही रुग्णांना जास्त त्रास का होतो?
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण.
 
"जे जे रुग्णालयात म्युकर मायकॉसिसमुळे उपचार घेणारे बहुतांशी रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत," असं डॉ. पारेख सांगतात.
 
"कोरोनासंसर्गात मधुमेह वाढतो. इम्युनिटी कमी झाल्याने म्यूकर मायकॉसिस जास्त घातक ठरतोय. मधुमेह नसलेल्यांना उपचारादरम्यान स्टिरॉईड दिल्याने शरीरात सारखेची मात्रा वाढते. अशा रुग्णांमध्येही हा आजार घातक असल्याचं आढळून आलंय," असं डॉ. चव्हाण म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती