संजय राऊत : 'देवेंद्र फडणवीस या कारणामुळे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत'

गुरूवार, 25 मार्च 2021 (16:23 IST)
विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
"चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली होती, हे त्यांनी जाहीर करावं. विरोधी पक्षनेते नरेंद्र मोदींपेक्षा मोठे असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे. म्हणूनच कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत." असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशामुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेले शंभर कोटी रुपये खंडणीच्या आरोपांचे पत्र त्यांनीच लिहिले आहे की इतर कोणी? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
 
'राज्यपालांना यादीवर पीएचडी करायची आहे का?'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळली आहे. यावरूनही संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला. "राज्यपाल हल्ली खूप व्यस्त असतात. त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहित नाही."
"राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नाही. ते काय त्या यादीचा अभ्यास करत आहेत का? त्यांना पीएचडी करायची आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
महाविकास आघाडीमधील नेते आज (25 मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. पण पण राज्यपाल मुंबईत नसल्याने ही भेट आता टळणार आहे.
 
'संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते'
संजय राऊत यांच्या टीकेला भाजपनेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणत टोला लगावला आहे.
ते म्हणाले, "संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून केले की काय अशी शंका वाटते. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यासाठी जेव्हा भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांचा राजीनामा महत्त्वाचा वाटला. तेव्हा संजय राऊत यांचे वक्तव्य आले नाही. शिवसेना नेत्याची पाठराखण करायला विसरलेले संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मात्र पाठराखण करताना दिसतात."
 
युपीएचं नेतृत्व काँग्रेस बाहेरील व्यक्तीने करावे-संजय राऊत
युपीएचं नेतृत्व काँग्रेस बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांचीही तशी भूमिका असू शकते असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसते. त्यांनी अनेक वर्ष युपीएचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळलं. पण आता देशात अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षात नाराजी नाही. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती