उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली
गुरूवार, 25 मार्च 2021 (11:00 IST)
उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच अशा प्रकारची चाचणी करण्यात आल्याचं जपानी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरवाअंतर्गत प्योंगयांगला बॅलेस्टिक क्षेपाणास्त्र चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. आपल्या प्रदेशातल्या कार्यक्षेत्रातील पाण्यात कोणताही कचरा पडला नाही, असं जपानने स्पष्ट केलं. उत्तर कोरियाने पूर्व चीन समुद्राच्या उत्तर भागात (येलो सी) दोन बिगर बॅलेस्टिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचणीवर बंदी नाही. पण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ही घाबरवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक शस्त्र मानली जातात.
रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या चाचण्यांमुळे या भागातील सुरक्षा आणि शांतता धोक्यात आली आहे असं जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी (25 मार्च) सांगितलं.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या एका निवेदनात सुरुवातीला दोन 'अज्ञात प्रक्षेपक' सुरू झाल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. बायडन प्रशासन उत्तर कोरियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना या चाचण्या करण्यात आल्या आहेत. व्हाईट हाऊसची नवीन टीम आणि त्यांचे मित्रराष्ट्र सध्या उत्तर कोरियाच्या धोरणांचा आढावा घेत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात शिखर परिषद झाली. पण प्योंगयांगला मोठी आणि जीवघेणी अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यात ते अपयशी ठरले
उत्तर कोरियाची अवघ्या काही दिवसांतील ही दुसरी शस्त्रास्त्र चाचणी आहे. 21 मार्चला प्योंगयांगने दोन कमी पल्ल्याची शस्त्र (तोफ किंवा क्रूझ क्षेपणास्त्र) डागली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याचं वर्णन "नेहमीचा उद्योग" असं केलं आहे. ही अद्ययावत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांचे स्पष्ट उल्लंघन आहे. या संदर्भात जो बायडन यांचं प्रशासन उत्तर कोरियाच्या धोरणांचा आढावा घेत त्यांचं अण्वस्त्र धोरण सोडण्यासाठी मन वळवण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
फेब्रुवारी महिन्यात वॉशिंग्टनने प्योंगयांगशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उत्तर कोरियाने कॉव्हिड-19 आरोग्य संकटात जवळपास एक वर्ष विलगीकरणात काढलं. चीनसोबतचा व्यापारही जवळपास बंद केला आहे. पण त्यांचं लष्कर आता क्षेपणास्त्रांची चाचणी करून व्हाईट हाऊसचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतं.