नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर का केली टीका?
गुरूवार, 25 मार्च 2021 (16:15 IST)
युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्यावर भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टीका केलीय.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, "युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही बोललो, ते शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? ज्या गोष्टींशी संबध नाही त्या गोष्टींवर संजय राऊत यांनी चर्चा करू नये. इतकाच आमचा सल्ला आहे."
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांना खोचक टोमणा लगावला आहे
"कॅप्टन कोण व्हावा हे बाहेरचा खेळाडू सांगत नाही. युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी सांगतोय. कॅप्टन कोण हे सांगण्यासाठी टीममध्ये असावं लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने बोलून काही उपयोग नसतो."
युपीएचं नेतृत्व काँग्रेस बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांचीही तशी भूमिका असू शकते असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसते. त्यांनी अनेक वर्ष युपीएचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळलं. पण आता देशात अनेक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षात नाराजी नाही. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे."
'फास्ट बॉलिंग,गुगली आणि बॅटिंगही करणार'
महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे राजकीय सामने रंगले आहेत. सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या आरोप पत्रानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सत्ताधारी पक्षावर वेगळ्या शैलीत टीका केली. त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचितच करायचो. पण फिल्डिंग करायचो तेव्हा माझ्याकडून कधीही कॅच सुटत नव्हता."
"पण आता मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे," असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, "मला हल्ली अनेक लूज बॉल्स मिळत आहेत. जे मला सीमारेषेपार पाठवावे लागतात. बॉलिंगते बोलयाचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी लॉजिकल आणि ऑन द स्टॅम्प बॉलिंग करतो. म्हणून समोरच्यांना बॅटिंग करायला अडचण होते."
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्याची टीका केली होती. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "चौकशी कोणाची करायची असते, चोरी ज्याने पकडली त्याची की ज्याची चोरी पकडली गेली त्याची? ज्याने चोरी पकडली त्याचीच चौकशी करायची हा या सरकारचा न्याय आहे." अशी टीका त्यांनी केली.