नगरपालिका काळापासून अस्तित्वात असलेल्या रविवार कारंजा येथील यशवंत मंडई अत्यंत धोकादायक स्थितीत आल्याने महापालिकेकडून २४ भाडेकरूंना नोटिसा बजावून इमारतीचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून सदर इमारत पाडली जाणार असून, त्या जागेवर वाहनतळ उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.
रविवार कारंजा येथे नगरपालिका काळामध्ये व्यापार वृद्धीसाठी यशवंत मंडई उभारण्यात आली. जुन्या नाशिकचे आयकॉन म्हणून मंडईचा नावलौकिक झाला. मात्र शहर जसे वाढत गेले, त्याप्रमाणे व्यावसायिक इमारती उभ्या होत गेल्या.
कालांतराने यशवंत मंडईचे महत्त्व कमी झाले. मात्र शहरात मध्यवर्ती जागा असल्याने व रविवार पेठेतील वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर झाल्याने त्या जागेवर वाहनतळ उभारावे, अशी मागणी माजी नगरसेविका स्वर्गीय सुरेखाताई भोसले यांनी केली होती.
याबाबत स्मार्ट सिटी कंपनीचे प्रस्तावदेखील सादर केला होता. स्मार्टसिटी कंपनीच्या ५२ प्रकल्पांमध्ये यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्मार्टसिटी कंपनीकडून कालांतराने सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला.
हे ही वाचा: नाशिक: दुर्दैवी घटना; इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू…
रविवार कारंजावरील वाहनांची कोंडी लक्षात घेता अजूनही या जागेवर बहुमजली वाहनतळ, उभारावे अशी मागणी होत आहे.
आता यशवंत मंडईचे स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर इमारत कालबाह्य ठरत असल्याने धोकादायक स्थितीत आली आहे, असा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला त्यामुळे इमारतीमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन २४ भाडेकरूंना पश्चिम विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
इमारतीचा वापर थांबवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सदर मंडईही लवकरच वाढली जाणार आहे. त्या जागेवर महापालिकेतून अद्याप कुठलेही नियोजन नसले तरी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी बहुमजली वाहनतळ उभारण्याची मागणी केली आहे.