राज ठाकरे भाजपसोबत युती करण्याबाबत काय म्हणाले?

गुरूवार, 29 जुलै 2021 (13:40 IST)
युतीबाबतची चर्चा मीडियातच आहे. तुम्हीच प्रश्न तयार करायचे आणि तुम्हीच उत्तरं मागायचे असं कसं होईल. परप्रांतीयांबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्र हिताच्याच गोष्टी मी मांडत असतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे सध्या पुण्यात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
 
भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आल्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, ही चर्चा केवळ मीडियामध्येच आहे. चंद्रकांत पाटील यांना मी कोणतीही व्हीडिओ क्लिप पाठवलेली नाही. तशा प्रकारची क्लिप पाठवेन असं मी बोललो होतो. पण ती मी पाठवली नसून दुसरीकडून कुठून तरी त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल. त्याची माहिती घ्यावी लागेल.
 
नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील मला भेटले होते. तिथं अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. त्यात हासुद्धा एक विषय होता. मी त्यांना म्हणालो, मुळात पहिल्यांदा माझं भाषण युपी-बिहारच्या नागरिकांना कळलं. पण तुम्हाला नाही कळलं. मी काय बोललो ते तुम्हाला पाठवून देतो.
 
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, हो मला नक्कीच ते ऐकायला आवडेल. पण नंतर मी परत आलो. गडबडीत राहून गेलं. पण कुणीतरी त्यांच्यापर्यंत तो व्हीडिओ पाहोचवला, असं राज यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी परप्रांतीयांबाबत भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत जाण्याचा विचार आम्ही करू शकत नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं आहे.
 
त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र हिताच्या तसंच देशहिताच्याही अनेक गोष्टी मी मांडतो.
 
प्रत्येक राज्याने आपापली भूमिका कशी निभावली पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका, आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही, अशी माझी भूमिका आहे. आसाम मिझोराममध्येही तेच चालू आहे, मुळात असे प्रश्न निर्माण का होतात, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
 
व्यक्तीला मी कधीच विरोध करत नाही. माझं त्यांच्याशी वैयक्तिक देणं-घेणं नाही. भूमिकांना मी नक्की विरोध करतो. पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं समर्थनही केलेलं आहे. पटत नसेल तर मी ते स्पष्टपणे सांगतो, त्याच्यात गैर असं काहीही नाही.
 
लॉकडाऊन आवडे सरकारला
राज ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. पी. साईनाथ यांचं पुस्तक आहे दुष्काळ आवडे सर्वांना. तसेच आता वाटू लागलं आहे की लॉकडाऊन आवडे सरकारला, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
 
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. उद्योगधंदे बंद आहेत. तिसरी लाट येणार, येणार म्हणून सगळ्यांना घरात डांबून ठेवण्याची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले.
 
कोरोना लशींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.
 
दोन लशी घेतल्या असतील तर त्यांना अडवण्यात काहीही अर्थ नाही. उद्योग धंदे बंद आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मुलांची फी भरायची बाकी आहे. त्यामुळे काम सुरू असणं गरजेचं आहे.
 
तिसरी लाट येणार येणार म्हणून विनाकारण आता सगळं बंद करून ठेवण्याची आवश्यकता नाही. कुणी आपल्याला प्रश्नच विचारू नयेत यासाठी लॉकडाऊन आवडे सरकारला अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
 
बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक
बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, "आनंदी आहे पण समाधानी नाही, असं बाबासाहेब पुरंदरेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांना अजून काही इतिहासातून शोधता येईल का, असं वाटत राहायचं. मी लहानपणापासून बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने ऐकली आहेत. आजही ऐकतो."
 
"मला प्रत्येक वेळी असं वाटतं की ते फक्त शिवचरित्र सांगत नाहीत. तर त्या माध्यमातून आपण आज 2021 मध्ये कसं जगायला पाहिजे, देशातील हिंदूंनी कसं सावध असलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब सातत्याने करत आले आहेत. आजच्या काळातही त्या गोष्टी लागू होतात," असं राज ठाकरे म्हणाले.
"आमच्या प्रत्येक गाठीभेटीवेळी बाबासाहेब नवीन काहीतरी ऐतिहासिक साक्षात्कार घडवतात. मला यामध्ये खूप रस आहे. आपल्या येथील आडनावे, खाद्यपदार्थ कुठून आले, त्याचा शोध इतिहासात मिळतो. या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांकडून समजून घेता येतात. बाबासाहेबांशी माझी अनेकवेळा विविध विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत मी स्वतःला नशीबवान समजतो.
 
"बाबासाहेब पुरंदरे यांची लिखाणाची भाषा पाहिल्यास ती अलंकारिक आहे, पण अतिरंजित नाही. बाबासाहेबांच्या संपूर्ण लिखाणादरम्यान त्यांनी इतिहासाला कधीच धक्का लावला नाही. शिवाय, दंतकथांनाही त्यामध्ये शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानांमध्ये जे काही सापडलं, असं सत्यच त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलं," असं राज ठाकरे म्हणाले.
 
बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यांच्यातील संवाद पाहण्याचा मला योग आला. त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो, असं राज ठाकरे म्हणाले.
 
ज्या लोकांना जाती-जातीत भेद करून मतदान हवं आहे, त्यांनीच बाबासाहेबांवर टीका केली. ती माणसं त्यांच्यासमोर किरकोळ आहेत. त्यांचा हेतू काय आहे, हे सर्वांना माहीत आहे.
 
महापालिका निवडणुकांसाठी मनसेचं नियोजन काय?
काही ठिकाणी साचलेपणा येतो. त्यामध्ये बदल करण्याचे काम संघटना म्हणून करावे लागतात. गेल्या एक-दीड वर्षांपासून माझा विचार होता. पण लॉकडाऊनमध्ये कुणीच काही करू शकलं नाही. माझाही त्यात वेळ गेला. त्या दृष्टीने धोरण ठरवत आहोत. ते सार्वजनिकपणे सांगण्याची आवश्यकता नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती