पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने 10 हजारांची मदत

गुरूवार, 29 जुलै 2021 (13:02 IST)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. शुक्रवारपासून ही रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 
 
पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये रोख व धान्य स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत राज्याच्या सर्व पूर व आपत्तीग्रस्त भागात दिली जाईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
ते म्हणाले की, दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पुरामध्ये जी घरे गेली किंवा घरात पुराचे पाणी शिरले आहे, त्या सर्व कुटुंबांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पूर्णपणे घर पडले असेल तर त्यालादेखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये आपत्ती निवारण फंडातून देण्यात येणार आहेत.
 
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा पंचनाम्याद्वारे एकत्रित करून मदत करण्यात येईल. राज्यात मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावासाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. पूरस्थितीत योग्य नियोजनामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही.
 
वडेट्टीवार म्हणाले की, अलमट्टी व महाराष्ट्रातील धरणांच्या व्यवस्थापनात योग्य समन्वय राखला गेल्याने बॅकवॉटर किंवा फुगवट्याचा कोणताही प्रश्न उद्‌भवला नाही. योग्य नियोजनाचे हे यश म्हणावे लागेल.
 
राज्यातील पूरग्रस्त गावांमध्ये शक्य त्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती उभारण्यासह अन्य उपाययोजनांबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती