अहमदनगरमध्ये वडापाव एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. वडापाव पाच रुपये कमी पडले म्हणून वडापाव दुकानदाराने ग्राहकाचा खुन केला आहे. अहमदनगर च्या एमआयडीसी भागातील सह्याद्री चौकात ही घटना घडली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण कांबळे हा तरुण वडापावच्या दुकानावर गेला होता. दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयाला असल्याचं सांगितल्यानंतर प्रवीणने त्याला पाच रुपये कमी करण्यास सांगितलं. यावरुन दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. वडापाव दुकानदाराच्या मदतीला आलेल्या आसपासच्या काही लोकांनी मिळून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या प्रवीणला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.