त्र्यंबकेश्वर देवस्थानला श्रावण महिन्यात सुमारे पाच कोटीहून अधिकची कमाई

सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (20:43 IST)
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला श्रावण महिन्यात जवळपास पाच कोटीहून अधिक रक्कम सशुल्क दर्शनातून जमा झाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. या दोन महिन्यात सुमारे १२ लाखांहून अधिक भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. २३ जुलै रोजीच्या एकाच दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थानला १४ लाखांचे उत्पन्न सशुल्क दर्शनातून मिळाले.
 
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी दर्शन रांगेसह सशुल्क दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यातून १८ जुलै ते १४ सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच कोटी तीन लाख ७९ हजार ८०० रुपयांची कमाई देवस्थानकडे जमा झाली आहे. १८ जुलै रोजी अधिक मासाला प्रारंभ झाल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी संपला. या एक महिन्याच्या कालावधीत सशुल्क दर्शनातून २ कोटी ६१ लाख २१ हजार ८०० रुपये जमा झाले.
 
१७ ऑगस्ट रोजी श्रावण सुरुवात होऊन १४ सप्टेंबर रोजी श्रावण संपला, या एक महिन्याच्या कालावधीत २ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपये सशुल्क दर्शनातून जमा झाले. अशा पद्धतीने दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५ कोटी ३ लाख ८० हजारांची कमाई त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला झाली. या दोन महिन्यांच्या कालावधीत पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले होत असत. पहाटेपासूनच भाविकांची तुडुंब गर्दी दर्शनासाठी असायची. यात अनेक भाविक दोनशे रुपयांच्या सशुल्क दर्शनाचा माध्यमातून ही रक्कम जमा झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती