बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये दुसरा श्रावण सोमवार असल्याने भाविकांची गर्दी दिसून आली. रविवार दुपारपासूनच भाविकांनी त्र्यंबकेश्वरला गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी चार वाजेपासून येथील भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.
तर मागील सोमवारी रोजी नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळत होती. मात्र, दुसरा सोमवार असल्याने भाविकांची काही प्रमाणात गर्दी झाली आहे.
देवस्थान ट्रस्टकडून व्हीआयपी प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तसेच श्रावण महिन्यात त्र्यंबकमध्ये व्हीआयपींना प्रवेश नसला तरी शासकीय व्हीआयपींना प्रवेश देण्यात येत असून देवस्थान ट्रस्टकडून मंदिर परिसरातील कोठी कार्यालयालगत विशेष व्हीआयपी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या व्हीआयपी कक्षाला जोडूनच आरोग्य सेवा कक्ष देखील सुरु करण्यात आला असून भाविकांच्या विश्रांतीसाठी मंदिराच्या आवारात एक मंडप उभारण्यात आला आहे.
दुसरीकडे ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील पेगलवाडी फाट्यापर्यंत जागोगाजी भाविकांची गर्दी होती. तर रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच प्रदक्षिणा मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.भाविक आजारी पडल्यास त्याच्या मदतीसाठी आरोग्य विभागाकडून प्रदक्षिणा मार्गावर डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांच्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.