राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असे स्पष्टीकरण रविवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. सध्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये बराच गोंधळ आहे. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत, त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्यावतीने आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती.