एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोणाचे आमदार अपात्र ठरणार? निकाल थोड्याच वेळात
बुधवार, 10 जानेवारी 2024 (15:29 IST)
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काही वेळात देणार आहेत.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या.
या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली. तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता राहुल नार्वेकर वाचून दाखवतील.
10 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडेल. या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी सहा गटात करण्यात आली होती. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील.
परंतु हे सहा निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील.
हा निकाल साधारण 1200 पानांचा असेल. याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल 200 पानांहून अधिक आहे. निकालादरम्यान केवळ यातील ठळक मुद्दे अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिलांना बोलवलं जाईल.
हा निकाल अध्यक्ष वाचून दाखवतील परंतु सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात येणार नाही. या निकालाला दोन्हीपैकी एका गटाकडून आव्हान दिल्यास प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल.
या निकालात चार महत्त्वाच्या गोष्टी यापुढील सर्व अशा प्रकरणांसाठी स्पष्ट होतील असा दावा विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी केला आहे.
1. पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
2. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
3. अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.
विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "लोकांनी जो गृहीत धरलेला आहे तसा निकाल नसेल. निकालात समतोल साधलेला असेल."