राज्यात खातेवाटप जसे सोप्या पद्धतीने झाले तसेच सर्वच जिल्ह्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती लवकरच सोप्या पद्धतीने केली जाईल. त्यात कुठलाही वाद नाही. मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे. विरोधी पक्षांनी त्यांची चिंता करु नये, असा खोचक सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. फडणवीस शनिवारी सायंकाळी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी मधील एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता खातेवाटप झाले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्ती लवकरच होतील. आमच्यासाठी तो काही मोठा मुद्दा नाही. तिन्ही पक्षांनी ठरवले आहे की एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. म्हणून मला नाही वाटत की पालकमंत्री पदावरुन काही वाद होईल. सरकारमध्ये कुठलीही नवीन व्यवस्था निर्माण केलेली नाही. सर्व काही जुनेच आहे. मंत्रिमंडळ विस्तारही सहज होईल. विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असेही फडणवीस म्हणाले.