देश व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अजित पवार यांची मंगळ देवाला प्रार्थना

शुक्रवार, 16 जून 2023 (21:33 IST)
अमळनेर-: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार दि. 16 जून रोजी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ देवाला देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत संकल्प सोडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. अमळनेर येथील सभेला उपस्थिती दिल्यानंतर त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळ देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी मंदिरात येऊन गेलो. मंदिराच्या विकासासाठी पूर्वी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो पूर्ण झाला नाही, आता पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्याच्या माध्यमातून विकासात्मक कामे सुरू आहेत. 

मंदिराच्या विकास कामांसाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करीत असतो. यामुळे अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध होत असल्याचे ते म्हटले. यावेळी त्यांच्या समवेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,पणनच्या माजी संचालिका तिलोत्तमाताई पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, यांच्यासह कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी अजितदादा पवार, जयंत पाटील यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती, महती विषद केली. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, विश्वस्त, व्यवस्थापक हेमंत गुजराती उपस्थित होते. 
देशातील मंदिरांनी मंगळ ग्रह मंदिराचा आदर्श घ्यावा : जयंत पाटील
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराने एक चांगला व आदर्श देणारा ठेवा जपला आहे. धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिकतेचा वसा मंदिराकडून जोपासला जात आहे. देशातील मंदिराच्या अध्यक्ष व विश्वस्तानी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळग्रह मंदिराकडून राबविले जाणारे आदर्श उपक्रम आपल्या मंदिराच्या माध्यमातून राबवावे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंगलदोष संदर्भात भाविकांमध्ये ज्या अंधश्रध्दा आहेत. त्या दूर करण्याचे काम मंगळग्रह संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांची उपस्थिती होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती