विठ्ठलनामाच्या गजरात संत सखाराम महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
अमळनेर: गळ्यात टाळ, हातात मृदुंग, मुखातून विठ्ठलनामाचा गजर करीत सोमवारी दुपारी येथील संत सखाराम महाराज संस्थानातून दरवर्षीप्रमाणे पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दरम्यान अनवाणी चालत जाणार्या वारकर्यांची तृष्णा थंडगार पाण्याने भागविण्याचे कार्य श्री मंगळग्रह मंदिराच्या सेवकर्यांकडून करण्यात आले.
येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाची पायी दिंडी संतश्री प.पू. प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वात मार्गस्थ झाली. पहाटे पैलाड भागातील तुळशीबागेत संतश्री प्रसाद महाराज यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी संत सखाराम महाराज संस्थानात ग्रामीण भागातून दाखल झालेले शेकडो भाविक व वारकर्यांनी संतश्री प्रसाद महाराज यांचे दर्शन घेतले.
असा असेल दिंडी मार्ग
संतश्री सखाराम महाराज संस्थानाची ही दिंडी आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बेलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळी, राजेराय, दौलताबाद, वाळूज, महारूळ, बिडकीन, ढोरकीन, पैठण, शेवगाव, कडा, आष्टी, जवळा, करमाळा, अरणगाव, नात्रज, निंभोरे, वडशीवणे, सापटणे, करकममार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे.
मंदिराच्या उपक्रमाचे कौतुक
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे यंदा प्रथमच पंढरपूरला पायी जाणार्या वारकर्यांना अमळनेरपासून ६ कि.मी. अंतरापर्यंत थंड पाणी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ संतश्री प्रसाद महाराज यांच्या आशीर्वावादाने मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हस्ते सोमवारी संत सखाराम महाराज संस्थानात वारकर्यांना पाणी वाटप करून करण्यात आले. यावेळी सचिव सुरेश बाविस्कर व सेवेकरी उपस्थितीत होते. दरम्यान कडाक्याच्या उन्हात वारकर्यांची तृष्णा थंड पाण्याने सेवेकर्यांकडून भागविण्यात आल्याने या उपक्रमाचे उपस्थितांकडून तोंडभरून कौतुक केले जात होते.