निधी जाहीर करुन अपघाताचे प्रश्न सुटणार नाहीत’ ; शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

शनिवार, 1 जुलै 2023 (22:06 IST)
बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो असे लोक सांगतात’, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
 
बुलढाणा अपघातावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, ”समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. हे अपघात सातत्याने होत आहेत. हे चित्र गेले काही महिने बघायला मिळत आहे. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात”, अशा शब्दात शरद पवार यांनी बुलढाण्यातील अपघातावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा गावाजवळ झालेला अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. यावरून आता राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे आणि त्यांन काही सल्लेदेखील दिले आहे. ते म्हणाले की, हा अपघात प्रचंड दुर्देवी आहे. त्यात अनेक नागरिक दगावले. त्यांना राज्य सरकारने 5 लाखांचा निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी जाहीर करुन अपघाताचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे अपघाताचं मुळ शोधून त्यावर उपाययोजन करा.
 
पवारांनी दिला ‘हा’ सल्ला
पवार यांनी पुढे म्हटलं आहे की, समृद्धी मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचा जीवदेखील गेला आहे. कोणत्याही परिसरात किंवा कुठेही अपघात झाला तर त्याला सरकारला दोषी ठरवलं जातं. मात्र, हे सगळं न करता रस्ता उपाययोजना राबवा आणि रस्त्याच्या संबंधित असलेल्या तज्ज्ञांचं विशेष पथक तयार करुन समृद्धी महामार्गाचा आढावा घ्यावा. त्यानंतरच अपघात रोखले जातील. अपघाताचं मूळ लक्षात आलंं की त्यावर उपाययोजना देखील करता येतील.
 
रस्ते हिप्नॉसिस असल्याची शंका अनेकांनी बोलून दाखवली आहे. पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, लांबच्या प्रवासादरम्यान सरळ रस्त्यांवर नैसर्गिक अशा खुना नाहीत त्यामुळे चालकाला रस्ता आणि त्यावरच्या पट्ट्या दिसतो. याच रस्त्याच्या रचनेचा परिणाम चालकावर होऊ शकतो, असं मला वाटतं. मात्र मला या रस्ते नियोजनाचं फार ज्ञान नाही, ज्यांना ज्ञान असेल त्यांच्याकडून याची माहिती घेणं आता आवश्यक झालं आहे. नाहीतर असे अपघात सुरुच राहतील’, असंही ते म्हणाले आहेत.
 
Edited  By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती