संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन photo

सोमवार, 19 जून 2023 (08:40 IST)
सातारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.  फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि  हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.
 
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.
 
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी  तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी केली होती.  हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते.  विविध विभागांचे सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.
 
प्रशासनाने पुरविल्या वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा
 आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पाडेगांवमध्ये आगमन झाले. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा यासह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
 
पालखीला मानवंदना, वाद्यवृंदाच्या सुमधुर संगीताने स्वागत
नीरा नदीच्या तीरावर पाडेगाव येथे पालखी स्वागताच्या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच बँड पथकाद्वारे स्वागत करून  मानवंदना देण्यात आली.
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती