आळंदी : संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात पास देण्यावरून वाद, वारकरी-पोलीस यांच्यात झटापट, फडणवीस म्हणाले...

सोमवार, 12 जून 2023 (13:15 IST)
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलीस आणि वारकरी यांच्यात झटापट झाल्याचं दिसून आलं.
 
सदर वाद हा मंदिरात प्रवेश देण्यासाठी वितरीत करण्यात आलेल्या पासच्या मुद्द्यावरून झाला असून याबाबत विविध प्रतिक्रिया माध्यमांमध्ये येत आहेत.
 
दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
यातून मार्ग काढण्यासाठी वारकऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
 
नेमकं काय घडलं?
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरवर्षी आळंदी येथून पंढरपूरपर्यंत जाते. यंदा ही पालखी 11 जून रोजी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल, असं नियोजन होतं.
 
पण या कार्यक्रम सोहळ्यात मंदिरात प्रवेश करण्याच्या कारणावरून पोलीस आणि वारकरी यांच्यात झटापट झाली.
 
इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे वारकरी आणि पोलीस एकमेकांना भिडल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे. पोलीस-वारकरी झटापटीमुळे वादाचं गालबोट लागलं आहे.
 
यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
राजकीय प्रतिक्रिया
संबंधित प्रकरणावरून तात्काळ तीव्र राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
 
ते म्हणाले, “महाराष्ट्राला वारीची 300 वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केलेला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे.
 
"हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते. सरकारने संयत अशा वारकरी बांधवांना काठी उगारायला लावू नये", असं पाटील म्हणाले.
 
तर उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यासंदर्भात राज्य सरकारवर टीका केली.
 
त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी समस्त वारकरी आसुसलेला असतो. हा संपूर्ण वारकरी वर्ग आळंदीत एकवटतो. या वारीला सुरुवात झालेली असताना आजच कधी नव्हे ते वारकऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला आहे.
 
“याआधी महाराष्ट्रात कधीही हे घडलेलं नाही. दरवर्षी वारी निघते, लोक जमतात, भक्तिभावाने दर्शन होतं, सगळं शिस्तीत पार पडतं. पण यावर्षी ज्या पद्धतीने लाठीहल्ला झाला, तो निंदनीय प्रकार आहे.
“उठता-बसता सतत हिंदुत्वाचा जयघोष करणारं शिंदे-फडणवीस सरकार यावर काय भूमिका घेणार आहे, वारकऱ्यांवरील अमानुष हल्ल्याबद्दल ते काय बोलणार आहेत, असा सवाल अंधारे यांनी केला.
 
“वारकऱ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण वारी पार पडेपर्यंत पोलिसांना सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
 
तर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
 
"महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
 
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पास देण्याचा निर्णय
“याठिकाणी गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होती. ती टाळण्यासाठीच यंदा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण हा निर्णय मान्य नसल्याने काही तरुण वारकऱ्यांसोबत झटापट झाली,” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
 
फडणवीस पुढे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाठीमार झालेला नाही. पण बाचाबाची किंवा झटापट झाली आहे. त्यासंदर्भातील खरी वस्तुस्थिती अशी की मागील वर्षी त्याठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. काही महिलाही त्यावेळी जखमी झाल्या होत्या.”
 
“त्यासंदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, ट्रस्टी ढगे-पाटील आणि मानाच्या दिंड्यांचे प्रमुख सहभागी झाले होते. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून काय करायचं, याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आलं होतं की 75 पासेस मानाच्या दिंड्यांना पहिल्यांदा उपलब्ध करून द्यावेत आणि त्यांना आधी आत सोडावं,” असं त्यांनी सांगितलं.
 
“या निर्णयानुसार, मानाच्या दिंड्यांचे लोक आतमध्ये गेले. पण. हा निर्णय आम्हाला मान्य नाही, असं काहींचं म्हणणं होतं. आम्हालाही आत सोडलं पाहिजे, असं ते म्हणत होते. यादरम्यान, 400-500 तरुण वारकऱ्यांनी बॅरिकेड तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान पोलीसही जखमी झालेले आहेत. आपण व्हीडिओ पाहिले तर कुठेही लाठीमार झालेला नाही. नंतर सगळी परिस्थिती शांत झाली आहे. चर्चादेखील सुरू आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
 
“चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठीच हा निर्णय झालेला होता. पोलिसांनी कोणताही नवा निर्णय दिलेला नाही. तथापि, या घटनेकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. दिंड्यांची सुरुवात झालेली असताना कुठेही चुकीची घटना घडू नये, अशी आपली अपेक्षा आहे.”
 
“काही माध्यमांनी ही घटना अतिशय संयमाने योग्य प्रकारे दाखवली. काहींनी खूप मोठा लाठीमार झाला, असं चित्र तयार केलं. हे करणं योग्य नाही. विनाकारण जनतेच्या भावना भडकतील, असं काम करू नका.”
 
“काही राजकीय पक्षांनाही माझं आवाहन आहे. याबाबत कुणीही राजकारण करू नये. आपल्याला लोकांची आणि वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा निर्णय सर्वानुमते झालेला होता. त्यामुळे पोलिसांनी तशा प्रकारे पास दिले होते, त्यांनाच आत सोडलं.”
 
“मागील वर्षी चेंगराचेंगरी झाल्यानंतर आम्ही त्यातून बोध घेऊन यावर्षी काय नीट करता येईल, याचा प्रयत्न करत आहोत. पण या मुद्द्याचं राजकारण होत असल्यास त्यांच्या बुद्धीची मला कीव येते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
 
पोलिसांनी काय म्हटलं?
आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली, असं स्पष्टीकरण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलं.
 
"पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या."
 
"मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे," असं चौबे यांनी म्हटलं.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती