यंदा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी एक दिवस आधीच पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होणार

गुरूवार, 27 एप्रिल 2023 (07:24 IST)
आषाढीला पंढरपूरसाठी दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी मार्गस्थ होत असते. दरम्यान समस्त वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारी सोहळ्याचे नियोजन आणि मार्ग संस्थानने जाहीर केला आहे. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. त्यामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनूसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार आहे.
 
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान संदर्भात देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी निवृत्तीनाथ पालखी संदर्भात माहिती दिली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 2 जून रोजी दुपारी 2 वाजता प्रस्थान होणार आहे. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजे एक दिवस अगोदर होणार आहे.
 
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा येथे होणार असून 7 जून रोजी दरवर्षींप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान समस्त वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी वारी सोहळ्याचे नियोजन आणि मार्ग संस्थानने जाहीर केला आहे.
 
त्यानुसार यंदा 2 ते28 जून या कालावधीत वारी असून त्यात 42 दिंडी सहभागी होणार आहे. दरवर्षी पालखी प्रस्थान हे दुपारी बारा वाजता होत असे. त्यानंतर संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये मिरवणूक होऊन पालखी शहराबाहेर मार्गस्थ होण्यास मोठा विलंब होत होता. त्यानंतर थेट सातपूरपर्यंतचा टप्पा मोठे अंतर होते, त्यामुळे यंदा एक दिवस अगोदर प्रस्थान करून मिरवणूकीनंतर महानिर्वाणी आखाडा येथे पहिला मुक्काम होणार आहे. त्यानंतर सातपूर व पुढील सर्व मुक्काम नियमित ठेवण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती