नाशिक : राजस्थानहून हैदराबादेत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८५ उंटांची नाशिकमध्ये सुटका करण्यात आली. अॅनिमल वेल्फेअरच्या पथकाने या उंटांची सुटका करून सर्व ८५ उंटांना चुंचाळे येथील पांजरपोळ येथे सोडण्यात आले. विशेष म्हणजे धुळे ग्रामीण व शहर पोलिसांनी एवढ्या संख्येने उंट पायी नेण्यात येत असताना साधी चौकशीदेखील करण्यात अाली नसल्याची माहिती अॅनिमल वेल्फेअरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अॅनिमल वेल्फेअरचे पुरुषोत्तम आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथून तब्बल ८७ उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी उंट वाहतूक करणाऱ्यांची चौकशीही केली नाही. उंट शहर पोलिस अायुक्तालयाच्या आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे अाल्यानंतर अाव्हाड यांनी पोलिसांना कळवले. मात्र, पोलिसांनी तपोवनात एवढ्या संख्येने उंट राहिल्यास परिसरात अस्वच्छता निर्माण होईल याचे कारण देत उंटांना तपोवनातून पुढे काढून दिले. भद्रकाली पोलिसांनीही कारवाई केली नाही. आव्हाड यांनी पशुवैद्यकीय पथकासह सर्व उंटांची तपासणी केली असता २ उंटांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले. दरम्यान, उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. या रॅकेटमागे मोठे व्यापारी असल्याचा संशय यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.