शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला

शुक्रवार, 5 मे 2023 (20:20 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून तेच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी (ता. 5) पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर आता शरद पवार आपली ठोस भुमिका पत्रकार परिषदेत मांडली.
 
“हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक”
“देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

“…म्हणून मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”
“माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
 

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती