एटीएसकडून पुण्यात 12 लाखांचे ड्रग्ज जप्त

मंगळवार, 3 मे 2022 (21:11 IST)
पुणे : मुंबईहून पुण्यात विक्रीकरिता आणण्यात आलेला 12 लाख रुपयांचा 118 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात दहशतवादविरोधी पथकास (ATS) पुण्यातील मालधक्का परिसरात यश आले आहे.  
 
याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी महंमद फारुख महंमद उमर टाक (वय 43, रा. अंधेरी, मुंबई, मु. रा. राजस्थान) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून एकजण अंमली पदार्थ घेऊन पुण्यात येणार असल्याची माहिती एटीएसच्या पुणे पथकास मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मालधक्का चौकात सापळा रचला असता मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर एकजण संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत त्याच्याजवळील बॅगेची पाहणी केली असता त्यात 12 लाख रुपये किमतीचा 118 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ सापडला. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक पेरणेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती