अशोका बिल़्कॉनचे संचालक आशिष कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित बिल्डर यांच्या सहकार नगर येथील मोंटेसिटो प्रकल्पामध्ये कटारिया यांनी सुमारे दीड वर्षांपासून 4 फ्लॅट विकत घेतले. पूर्ण पेमेंट दिल्यानंतर सदर फ्लॅटचा करारनामा करण्यात आला. सदर फ्लॅट पुणे येथील पंकज छल्लानी व भागचंद छल्लानी यांच्याकडून विकत घेतले होते. तत्पूर्वी छल्लानी यांनी अमित बिल्डर्सचे भागीदार किशोर पाटे यांच्याकडून हे फ्लॅट घेतले होते. मात्र, छल्लानी यांनी पूर्ण पैसे दिल्यानंतरही सुमारे 9.5 कोटी रुपये येणे बाकी आहे, अशी खोटी बतावणी अमित बिल्डर्सने केली. त्यातच छल्लानी यांच्याबरोबर किशोर पाटे, रोहन पाटे आणि संकेत पाटे यांनी संगनमत करून आशिष कटारिया यांच्याबरोबर झालेल्या करारनाम्याच्या तारखे अगोदर या फ्लॅटचे रद्दपत्र तयार केले. तसेच, कटारिया यांना कळविण्यात आले की तुम्ही घेतलेले फ्लॅट बेकायदेशीर आहेत. तुम्ही फ्लॅट घेण्याच्या अगोदरच छल्लानी व अमित बिल्डरचे रद्दपत्र झालेले आहे. तुमचा या फ्लॅटवर कुठलेही हक्क नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आशिष कटारिया यांच्या लक्षात आले.
सदर रद्दपत्र व स्टॅम्प पेपर बद्दल शंका आल्याने आशिष कटारिया यांनी ट्रेझरीतून आणि दुय्यम निबंधक कार्यालयातून RTI माध्यमातून माहिती मागवली. त्यात हे स्पष्ट झाले की, हे स्टॅम्प पेपर आशिष कटारिया व छल्लानी यांच्या करारनाम्यानंतर असल्याचे दिसून आले. स्टॅम्प पेपरवर तारखे मध्ये खाडाखोड करून तारीख बदलण्यात आली. आशिष कटारिया यांच्या खरेदीखताच्या अगोदरचे रद्दपत्र झाल्याचे दाखवून बनाव रचण्यात आला. ही बाब आशिष कटारिया यांच्या ध्यानात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने फसवणुकीची तक्रार दत्तवाडी पोलीस स्टेशनला दि.10/03/2020 रोजी दिली. परंतु दत्तवाडी पोलीस स्टेशनने याची दखल न घेतली नाही. पोलिस दाद देत नसल्याने आशिष कटारिया यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार कलम 156 /3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायलयाने दिले. परंतु दत्तवाडी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यातच अमित बिल्डरने यावर स्थगिती आदेश मिळवला. संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने दि 27/04 /2022 रोजी सदरची स्थगिती उठवली आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतरही दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कृष्णा इंदलकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे नाकारले. न्यायालयाचा आदेश असूनही FIR नोंदविण्याचे काम केले नाही. एकप्रकारे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आला. या प्रकरणी आशिष कटारिया यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. तसेच, हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री कृष्णा इंदलकर यांच्यावर अवमान प्रकरणी कारवाई करण्यात यावी असा अर्ज दिला.
न्यायालयाने याची त्वरीत दखल घेतली आहे. तसेच, न्यायालयाने इंदलकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचे धाडस पोलीस स्टेशनचे पीआय कसे करू शकतात, यावर सध्या चर्चा सुरु आहे. तसेच, या पीआयवर कुणाचा वरदहस्त आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पाटे व छल्लानी यांचे मोठ्या प्रमाणावर राजकीय व्यक्तींसोबत उठबस आहे. तर, पंकज छल्लानी हे MPID गुन्ह्यात तुरुंगात आहेत. त्यामुळे या हायप्रोफाईल गुन्ह्यात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.