जातीय विद्वेष वाढवणाऱ्या शक्तींच्या हातात हा देश जाता कामा नये : शरद पवार

बुधवार, 21 जून 2023 (20:42 IST)
मुंबई : जातीय विद्वेष वाढवणाऱ्या शक्तींच्या हातात हा देश जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्तांना केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन मुंबईत साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
 
शरद पवार म्हणाले की, मी खानदेशात गेलो होतो, तिथं लक्षात आलं की कापूस शेतकऱ्यांना घरात ठेवावा लागला आहे. मोदींनी सांगितलं होतं की, तीन वर्षात शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करू. पण राज्यातील 391 शेतकऱ्यांनी मागच्या पाच महिन्यात आत्महत्या केली आहे. 23 जानेवारी 2023 पासून 23 मे पर्यंत राज्यातील 3 हजार 152 महिला बेपत्ता आहेत. ही चांगली बाब नाही. गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, अकोला, अमळनेर अशा शहरात दंगली झाल्या. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथं नाही तिथं असे प्रकार सूरू आहेत. राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे.
 
मणिपूर प्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान अमेरिकेत गेले आहेत. त्यांना कुठे जायचे असेल तिथे त्यांनी जावे, मात्र देशातील प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. मणिपूरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दंगल सुरू आहे. त्या ठिकाणाहून मिळणारी माहिती अतिशय गंभीर आहे. एका अधिकाऱ्याने वक्तव्य केलं की, मणिपूरमध्ये जे घडत आहे ते गंभीर आहे. त्यामुळे आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हेच कळत नाही. चीनच्या शेजारी असलेल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे. राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती