हितोपदेशातील मनोरंजक कथा: आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची कहाणी आहे. एका नदीच्या किनाऱ्यावर एक विशाल वृक्ष होता. त्या झाडावर अनेक पक्षी राहायचे.दिवसभर चारा पाणी केल्यानंतर ते संध्याकाळी आपल्या झाडावर परत यायचे. एक दिवस जरद्गव नावाचा एक आंधळा गिधाड तिथे आला. गिधाड खूप आंधळा झाला होता. सर्व पक्षांना त्याच्यावर दया आली व त्यांनी त्याला तिथे राहण्यास परवानगी दिली. आता पक्षी जेव्हा अन्नाच्या शोधात गेले तेव्हा त्यांनी गिधाडांसाठीही अन्न आणले. तसेच त्या बदल्यात गिधाड पक्षांच्या पिल्लांची काळजी घेत असे. अशा रीतीने गिधाडांना कोणत्याही श्रमाशिवाय अन्न मिळू लागले आणि पक्षीही त्यांच्या मुलांसाठी कोणतीही चिंता न करता अन्नाच्या शोधात दूरवर प्रवास करू लागले. पक्षी आणि गिधाड आनंदाने दिवस घालवत होते.
एके दिवशी एक मांजर त्या जंगलात आली. मांजर खूप पाताळयंत्री आणि दुष्ट बुद्धीची होती. भटकत असताना तिची नजर झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या अंडीवर आणि पिल्लांवर पडली. तिच्या तोंडाला पाणी सुटू लागले. जेव्हा ती त्यांना खाण्यासाठी झाडावर चढली तेव्हा पिल्ले आवाज करू लागले. आवाज ऐकून गिधाड बाहेर आले आणि ओरडले, "कोण आहे तिकडे?"
तेव्हा मांजर घाबरली आणि झाडावरून खाली आली आणि गिधाडाला म्हणाली, “महाराज, मी मांजर आहे. मी या नदीच्या काठावर राहते. मी पक्ष्यांकडून तुमची खूप स्तुती ऐकली आहे. म्हणूनच मी दर्शनासाठी आले आहे.
यावर गिधाडाने तिला तिथून निघून जाण्यास सांगितले. कारण मांजर हे पक्ष्यांसाठी धोक्याचे आहे हे त्याला माहीत होते. आता मांजरला कळाले की, गिधाड आंधळे आहे. आपल्या पक्ष्यांची अंडी आणि बाळांना शिकार बनवणे सोप्पे जाईल.
तिने गिधाडाला आपल्या गोड बोलण्यामध्ये अडकवले. ती म्हणाली की, मला माहीत आहे तुम्हाला माझ्याबद्दल शंका आहे. तुम्हाला वाटते की मी पक्ष्यांच्या पिल्लाना ठार करेल पण माझ्यावर विश्वास ठेवा. एके दिवशी एक महात्मा मला भेटले व मी मांस खाणे बंद केले. मी पूर्ण शाकाहारी झाले आहे आणि माझा वेळ फक्त धार्मिक कार्यात आणि कार्यात घालवते.
आता गिधाड मंजिराच्या गोड बोलण्याला फसले. व त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला झाडाच्या बिळामध्ये त्याच्यासोबत राहण्याची परवानगी दिली. मांजरीला हेच हवे होते. ती त्याच बिळात गिधाडासोबत राहू लागली आणि संधीचा फायदा घेत ती पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले एक एक करून खाऊ लागली.
आता मात्र त्यांची पिल्ले आणि अंडी एकामागून एक गायब झाल्याने सर्व पक्षी चिंताग्रस्त आणि दुःखी झाले. एके दिवशी सर्वांनी त्याची चौकशी करण्याचे ठरवले. हे मांजराच्या लक्षात येताच ती बीळ सोडून पळून गेली. येथे चौकशी करत असताना पक्ष्यांनी झाडाच्या बिळात डोकावले असता त्यांना तेथे बरीच पिसे पडलेली दिसली. त्यांना वाटले की गिधाडाने त्यांची मुले खाल्ली आहे. ते सर्व संतप्त झाले आणि सर्व पक्षांनी मिळून गिधाडाला ठार केले. बिचाऱ्या गिधाडाने मांजरीवर विश्वास ठेऊनआपला जीव गमावला.
तात्पर्य : ज्याचे स्वभाव माहीत नाही अशा व्यक्तीला आश्रय देऊ नये.