नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते-प्रफुल्ल पटेल

शनिवार, 17 जून 2023 (08:12 IST)
शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. पण, शरद पवार यांनी वेळोवेळी याला नकार दिला आहे. अशातच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.
 
“मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. तेव्हा काँग्रेस अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
 
“तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.


Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती