राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय नेत्यांशी ज्यांचे लागेबंधे होते अशा कंत्राटदार, व्यावसायिकांच्या कार्यालयांवर, घरांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. गुरुवारी देखील आयकर विभागाने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापे टाकले. ज्यांच्यावर हे छापे टाकण्यात आले ते सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच, अजित पवार यांच्या तीन बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. दरम्यान, आयकर विभागाने कारवायांसंदर्भात एक प्रसिद्ध पत्रक जारी करत गेल्या सहा महिन्यांपासून आयकर विभागाने काय कारवाई केली आणि त्यात काय काय सापडले याची माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत एकूण १ हजार ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले आहेत. यात अजित पवार किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावाचा उल्लेख नाही आहे.
आयकर विभागाने गेल्या सहा महिन्यांपासून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर २३ सप्टेंबर २०२१ पासून मुख्य कारवा करण्यास सुरुवात केली. या कारवाईत मोठी भांडाफोड झाली आहे. यात महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती, दलाल आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. आयकर विभाग सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेत होता. यानंतर २५ निवासस्थाने, १५ कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. तर ४ कार्यालयांची रेकी करण्यात आली.
याशिवाय, आयकर विभागाने मुंबईमधील ओबेरॉय हॉटेलवर देखील छापा टाकत तिथल्या दोन खोल्यांची तपासणी केली. या दोन खोल्या दलालांनी कायमस्वरुपी भाड्यांनी घेतल्या. हे दलाल त्यांच्या ग्राहकांना म्हणजेच क्लायंट्सना भेटण्यासाठी या खोल्यांचा वापर करत होते. दलाल आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या या गटाकडून दस्तऐवजांमध्ये विविध गोपनीय सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता आणि काही दस्तावेज तर १० वर्षांपूर्वीचे होते. या शोधमोहिमेत एकूण १ हजार ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले.