भारतीय तांदुळाने जागतिक बाजारात पाकिस्तानची उडवली झोप

शुक्रवार, 2 जुलै 2021 (20:50 IST)
तनवीर मलिक
"मला आता भारतीय तांदूळ स्वस्तात मिळतोय म्हणून मी तो घेतोय. मला भारत आणि पाकिस्तानातून येणारा तांदूळ जरी एकाच किंमतीला मिळाला तरीही भारतातून येणाऱ्या तांदळाला माझं प्राधान्य असेल. हा तांदूळ शिजवायला ही चांगला आहे आणि चवीलाही चांगला आहे."
 
स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात राहणारे तांदळाचे व्यापारी ईसा केन सांगतात. भारत आणि पाकिस्तानातून तांदूळ विकत घेऊन आफ्रिकेतल्या देशात त्यांची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
 
ईसा सांगतात, "भारत आणि पाकिस्तानात पिकवल्या जाणाऱ्या तांदळाच्या दर्जात खरंतर फारसा फरक नसतो. पण तरीही भारतीय तांदळाची चव थोडी अधिक चांगली असते. सोबतच हा तांदूळ स्वस्तही आहे आणि म्हणूनच याला जास्त मागणी आहे."
 
यामुळे ईसा केन सध्या भारतातून जास्त आयात करतायत.
 
आणि याच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय तांदळाला पाकिस्तानी तांदळापेक्षा जास्त मागणी आहे.
 
भारताने तांदूळ स्वस्त करून निर्यात करणं हे एकप्रकारे 'डंपिंग' असल्याचं पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातदारांचं म्हणणं आहे.
 
डंपिंग म्हणजे बाजारपेठ काबीज करण्यासाठी एखादं उत्पादन त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत विकणं.तांदूळ निर्यातीबाबत बोलायचं झालं तर या क्षेत्रात पाकिस्तान आणि भारत एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.
 
बासमती तांदळाच्या GI Tag म्हणजेच Geographical Indication - भौगोलिक संकेत नोंदणीवरून भारत आणि पाकिस्तान या दोघांचा युरोपियन युनियनमध्ये लढा सुरु आहे.
 
बासमती तांदळाची GI नोंदणी आपल्या नावे व्हावी यासाठी भारताने युरोपियन युनियनमध्ये अर्ज केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही आपला दावा दाखल केला. बासमती तांदळावर दोन्ही देशांचा समान अधिकार असल्याचं पाकिस्तानने म्हटलंय.
 
या सगळ्यामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त तांदूळ देणं म्हणजे तांदळाचं डंपिग असून हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन असल्याचं पाकिस्तानी निर्यातदारांचं म्हणणं आहे.
 
 
भारतीय तांदळामुळे पाकिस्तानची निर्यात कशी कमी झाली?
आर्थिक वर्ष 2020-21 च्या 11 महिन्यांतली पाकिस्तानातली तांदूळ निर्यातीची आकडेवारी पाहिल्यास पाकिस्तानच्या निर्यातीवर झालेला परिणाम लक्षात येईल.
 
बासमती आणि इतर प्रकारच्या तांदळांची पाकिस्तानातून होणारी निर्यात या अकरा महिन्यात 14% पर्यंत कमी झाली. या काळात पाकिस्तानने 33 लाख टन तांदळाची निर्यात केली. गेल्या वर्षी याच कालावधीत 38 लाख टन तांदळाची निर्यात करण्यात आली होती.
 
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सरासरी 450 डॉलर्स प्रति टन किंमतीने तांदूळ विकत असल्याचं पाकिस्तान राईस एक्स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम पराचा सांगतात. पण त्याच दर्जाचा भारतीय तांदूळ सरासरी 360 डॉलर्स प्रति टन दराने उपलब्ध आहे.
 
भारतीय तांदूळ स्वस्त असल्याचा फक्त पाकिस्तानच्या निर्यातीवरच नाही तर थायलंड, व्हिएतनाम आणि इतर तांदूळ निर्यातदारांवरही परिणाम होतोय.
 
जागतिक बाजारात सध्या भारतीय तांदळाची किंमत आहे 360 ते 390 डॉलर्स प्रति टनदरम्यान. तर पाकिस्तानी तांदळाची किंमत आहे प्रति टन 440 ते 450 डॉलर्स.
 
व्हिएतनाम आणि थायलंडहून निर्यात होणाऱ्या तांदळांच्या किंमतीही जवळपास 470 डॉलरेस प्रति टन आहेत.
 
गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात भारतातून बासमतीखेरीज इतर तांदळांच्या निर्यातीचं प्रमाण 136 टक्क्यांनी वाढलं असल्याचं भारताच्या वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. याप्रकारे बासमती तांदळाच्या निर्यातीतही वाढ झालेली आहे.
 
भारतीय तांदूळ स्वस्त का?
भारत सरकारकडून शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येत असल्याने भारतातल्या शेतकऱ्यांचा तांदळाचा उत्पादन खर्च कमी असल्याचं पाकिस्तानातल्या निर्यातदारांचं म्हणणं आहे. यासोबतच भारतामध्ये रेशन यंत्रणेद्वारेही सरकार गरिबांना अतिशय कमी किंमतीत तांदूळ पुरवतं.
 
हा तांदूळ व्यापारी थोड्या अधिक किंमतीला विकत घेऊन त्याची निर्यात करतात, असा त्यांचा दावा आहे.
 
प्रत्येक व्यापारी बाजारपेठेतली मागणी पाहून त्याबद्दलचा निर्णय घेत असल्याचं तांदूळ आयात करणारे व्यापारी ईसा केन सांगतात.
 
केन सध्या जिनिव्हामध्ये असले तरी ते आफ्रिकेतल्या देशात तांदळाची विक्री करतात आणि सध्या तिथून भारतीय तांदळाला जास्त मागणी असल्याचं ते सांगतात. भारतीय तांदूळ फक्त पाकिस्तानच नाही तर म्यानमार आणि थायलंडच्या तांदळापेक्षा पुष्कळ स्वस्त असल्याचं ते सांगतात.
 
भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीसोबतच पाकिस्तानच्या तुलनेत भारतातून तांदूळ बोटीद्वारे निर्यात करण्याचा खर्च कमी असल्याने भारतीय व्यापाऱ्यांना तांदळाची जास्त निर्यात करता येत असल्याचं पाकिस्तानातले तांदूळ निर्यातदार तौफिक अहमद सांगतात.
 
'डंपिंग' करण्याचं कारण काय?
इतर देशांपेक्षा आपल्या तांदळाची जास्त विक्री व्हावी यासाठी भारत तांदळाचं 'डंपिंग' म्हणजेच कमी किंमतीत जास्त निर्यात करत असल्याचं तौफिक अहमद यांचं म्हणणं आहे.
 
हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन असून तांदूळ स्वस्त करत बाजारपेठ आपल्या ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
पाकिस्तानात तांदूळ व्यापार पूर्णपणे खासगी क्षेत्राच्या हाती आहे, पण भारतात सरकार यात हस्तक्षेप करत सबसिडीद्वारे तांदूळ स्वस्त करत असल्याचं तौफिक यांचं म्हणणं आहे.
 
भारतामधून होणाऱ्या या जास्त निर्यातीचा आपल्या व्यवसायावर परिणाम झाल्याचंही ते सांगतात.
 
भारत सध्या जे करतोय, ते डंपिंगप्रमाणेच असल्याचं राईस एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पाकिस्तानचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम पराचा यांचं म्हणणं आहे.
 
पण पाकिस्तानच्या निर्यातदारांचा हा दावा ईसा केन यांना पटत नाही. असा काही प्रकार घडत असल्याची माहिती आपल्याला नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
तांदूळ स्वस्तात विकणं हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन आहे का?
एखाद्या विशिष्ट उत्पादनाची अतिशय स्वस्त दरांमध्ये विक्री केल्याने जर दुसऱ्या देशातल्या त्याच वस्तूच्या निर्मितीला फटका बसला तर तो देश यावर कायदेशीर कारवाई करतो.
 
पण भारत फक्त एका विशिष्ट देशात तांदळाची स्वस्तात विक्री करत नसून जगभरात स्वस्त किंमतीत तांदूळ विकतोय.
 
भारतामध्ये कृषी क्षेत्राला ग्रीन फील्ड सबसिडी देण्यात आली असून तिथे पीक घेण्याचा खर्च तुलनेने कमी असल्याचं इक्बाल ताबिश सांगतात. उदा. 1 पोतं खताची भारतातली किंमत आहे 1,600 रुपये. तर पाकिस्तानात 1 पोतं खताची किंमत आहे 4,500 रुपये आहे.
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती