उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'

शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:10 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातील मुद्द्यांना उत्तरं दिली आहेत. विशेषत: विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची तारीख का घोषित करत नाही, याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिले आहे.
 
राज्याच्या विधिमंडळ सभागृह कामकाज सल्लागार समितीची 22 जून रोजी बैठक झाली आणि या बैठकीत डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरियंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि केंद्र सरकारनं दिलेला इशारा यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली.
 
सभागृह कामकाज सल्लागार समितीच्या सूचनेनुसारच, पावसाळी अधिवेशन 5 जुलै ते 6 जुलै 2021 या दोन दिवसांसाठी घेण्याबाबत निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.याच पत्रात मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मुद्द्यावरही सरकारची बाजू मांडली.
 
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, "कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणार नाही. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. त्यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. यात कोणत्याही घटनात्मक तरतुदीचा भंग झालेल नाही किंवा घटनात्मक अडचण आली नाहीय."
 
मुख्यमंत्री पुढे म्हणतात, "विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत सर्व सदस्यांना सहभागी होता यावं, अशा पद्धतीनं निवडणूक घेणं योग्य होईल, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आणि प्रयत्न आहे."
 
"WHO आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार 72 तासांच्या आतील कोव्हिडची चाचणी ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबतची तारीख अगोदर निश्चित करणं योग्य ठरणार नाही. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन, सर्व सदस्यांचे आरोग्य आणि उपस्थितीबाबत संपूर्ण खात्री झाल्यानंतर सर्व नियमांचं पालन करून विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 

'विधानसभा अध्यक्षांची निवड करा'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलंय. भाजप नेत्यांनी केलेल्या तीन मागण्यांबाबत यथोचित निर्णय घ्या, अशी सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली होती. पुढच्या आठवड्यात राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होतंय. कोरोनासंसर्गाच्या भीतीमुळे हे अधिवेशन दोन दिवसांचं ठेवण्यात आलंय. त्यावरून, भाजप आणि महाविकास आघाडी सरकार आमने-सामने आहे.
 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी याआधी एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळाले आहेत. राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही.
 

भाजपने उपस्थित केलेले तीन मुद्दे कोणते?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यातील महत्त्वाच्या मुद्दयांवर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असं निवेदन भाजप नेत्यांनी दिलं होतं. भाजपने मांडलेले मुद्दे
 

* राज्य विधिमंडळाचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्यात यावं.
* विधानसभा अध्यक्षांचं पद तातडीने भरावं.
* ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत.
 
कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती असल्याचं कारण सांगत महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं केलंय. भाजपने दोन दिवसीय अधिवेशनाचा विरोध केलाय. "महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा होत नाही. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय," असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केला होता.
 
ते म्हणाले होते, "कोरोनामुळे अधिवेशन घेण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी, कायदा-सुव्यवस्था अनेक प्रश्न आहेत. मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाची मागणी होत असताना सरकार, पावसाळी अधिवेशनही घेत नाही."
 

विधानसभा अध्यक्षांची निवड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालंय. त्यानंतर सरकारने नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड केलेली नाही. हा मुद्दाही भाजपने राज्यपालांपुढे उपस्थित केलाय.
 
अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असलं तरी, अनेक नेते अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासुद्धा नावाची त्यासासाठी चर्चा सुरू आहे.
 
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होईल असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीसुद्धा याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं सांगितलं आहे.शिवसेनेकडून मात्र यामुद्द्यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
 
"विधानसभा अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्धव  ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील,"अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेटे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती