अजित पवार : जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती, ED प्रकरणी अजित पवार काय म्हणाले?

शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:04 IST)
जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काही एक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
 
कारखाना तोट्यात गेल्यामुळे माझ्या नातेवाईकांनी तो चालवण्यास घेतला होता. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याच क्षमता वाढवली आहे, असं अजित पवार म्हणाले.
 
आज (शुक्रवार, 2 जुलै) एक पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याशी संदर्भात आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलं.
 
पवार म्हणाले, मुंबई हाय कोर्टाने साखर कारखान्यांना 1 वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. त्यानंतर ते कारखाने विक्रीस काढण्यास सांगितले होते. त्यामध्ये जरंडेश्वर कारखानाही होता. तो कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यानी टेंडर दाखल केल होतं. गुरू कमोडिटी कंपनीने तो कारखाना खरेदी केला. तो कारखाना BVG ग्रुपने तो कारखाना चालवण्यासाठी मागितला. पण त्यांना पहिल्या वर्षात तोटा झाला. त्यानंतर माझ्या नातेवाईकांनी तो चालवायला घेतला. त्यांनाही त्यात तोटा झाला. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याची कॅपसिटी वाढवली. त्यासाठी कर्ज घेतलं, त्यात पुणे जिल्हा सहकारी बँक आणि इतर बँक आहेत. त्याचं रिपेमेंट व्यवस्थित चालू आहे. तो गुरू कमोडिटी च्या नावाने असल्याने ईडीने त्यावर टाच आणली आहे.
 
ईडीला चौकशी करण्याचा अधिकार आहे. गेल्या काही दिवसांत इतर अनेक संस्थानीं चौकशी केली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे जप्तीविरोधात जरंडेश्वर कारखाना न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच काम त्या कारखान्यावर अवलंबून आहेत, असंही पवार यांनी म्हटलं.
 
जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती प्रकरण काय आहे?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे.
 
हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजेंद्र घाडगे सध्या या कारखान्याचं काम पाहतात.
 
या कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.
 
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि मशिनरी अॅटॅच करण्यात आली आहे. या प्रॉपर्टी गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे आहेत.
 
स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेडकडे या कारखान्याचे सर्वांत जास्त शेअर्स आहेत. तपासामध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे, असं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
 
हा कारखाना विकत घेण्यासाठीचे पैसे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॅाईल कंपनीने दिल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
 
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता.
 
माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
 
कारखाना सभासदांच्या ताब्यात?
जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माजी चेअरमन शालिनीताई पाटील यांनी लवकरच कारखाना आता सभासदांच्या ताब्यात येईल असा दावा केला आहे.
 
"ईडीची प्रक्रिया संपताच कारखाना सभासदांच्या ताब्यात येईल. जरंडेश्वर साखर कारखान्याचा बेकायदेशीर लिलाव केला म्हणून गेली दहा वर्षं खटला लढत होतो. 2 वर्षापूर्वी हायकोर्टाचा निकाल आला. शिखर बँकेत 25 हजार कोटीचा घोटाळा आहे. त्यानंतर आम्ही खटला लढत होतो त्यानुसार EDमध्ये FIR दाखल केली. पण त्यानंतर दोन वर्षांत कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यानंतर वकील तळेकर यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात पुन्हा अर्ज केला. समाजसेवक अण्णा हजारे हेही आमच्याबरोबर आहेत. याशिवाय औरंगाबादरचे माजी आमदार माणिकराव जाधव आणि मी असे हायकोर्टात लढत होतो. मी प्रत्यक्ष ऑर्डर घेतलेली नाही, पण आदेश मिळाला असल्यामुळेच ईडीने साखर कारखाना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आता सर्व प्रक्रिया संपताच सभासदांच्या ताब्यात हा कारखाना मिळणार आहे, " अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली आहे.
 
जरंडेश्वर नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण जवळून कव्हर करणारे पत्रकार सुरेश ठमके याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात,
 
"सध्या हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या ताब्यात आहे. राजेंद्र कुमार घाडगे हे अजित पवार यांचे सख्खे मामा आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर टाकलेली ही धाड आहे. राज्य सहकारी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे ज्यातून त्यांना क्लीनचिट देण्यात आली असली तरीही अद्याप ईडीकडून क्लीनचीट मिळालेली नाही.
 
"हा कारखाना आधी शालिनीताई पाटील यांच्याकडे होता. शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. शालिनीताई पाटील आणि अजित पवार यांचं वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी हा कारखाना अवसायानात काढला. ज्याचा लिलाव केला आणि अत्यंत कमी किंमतीत या कारखान्याचा लिलाव केला.
 
"त्याच बँकेत असलेले पैसे कारखान्याच्या कर्जासाठी ट्रान्सफर करा असा आग्रह शालिनीताई पाटील यांनी धरला होता. मात्र तो आग्रह मोडीत काढत कारखान्याचा लिलाव करण्यात आला आणि तो कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांनी घेतला. मात्र या सगळ्या प्रकरणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शालिनीताईंनी केला होता.
 
शालिनीताईंची चौकशीची मागणी
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली नसल्याचा आरोप करत तक्रारदार शालिनीताई पाटील यांच्यासह इतर तीन जाणांनी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर आणि कन्नड साखर कारखान्यांचा लिलाव अल्प दरात करण्याचा आणि ते नातेवाईकांनाच विकल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट देत विशेष न्यायालयात नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. पण अजित पवारांवर आरोप झालेल्या काही मुद्यांवर पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.
 
अजित पवार यांच्यावरील आरोप
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेले कर्ज थकीत केलेल्या साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यंत अल्प दरात या कारखान्यांची विक्री केली गेली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
त्यावेळी शिखर बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत अजित पवारांनीच कारखाने विकत घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
 
या कथित आर्थिक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये थेट आरोप करण्यात येत आहे.
 
पहिला आरोप - "सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव अल्प दरात करणे आणि आपल्याच नातेवाईकांना कारखाना विकणे."
 
दुसरा आरोप - "कन्नड साखर कारखाना लिलावात विक्रीला काढणे आणि आपल्याच पुतण्याच्या कंपनीला तो विकणे."
 
वरील दोन आरोपांसहीत याचिकाकर्त्यांनी विशेष न्यायालयात पोलिसांच्या चौकशीला विरोध करत पुन्हा एकदा चौकशीची मागणी केली आहे.
 
याचिकाकर्त्यांचे वकील माधवी अय्यप्पन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आमच्या याचिकेनुसार, अजित पवार शिखर बँकेवर असताना गरज नसतानाही जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला. लिलावात विक्री करताना शेवटच्या क्षणी आलेल्या गुरू कमोडिटी प्रायवेट लि. या कंपनीला कारखाना अल्प दरात विकण्यात आला."
 
"पण गुरू कमोडिटी प्रा. लि. कंपनीने हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला दिला. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स हे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचो आहेत. शिवाय, या कंपनीला पैसे पुरवणारी जय अॅग्रोटेक प्रा. लि. या कंपनीत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे 100 टक्के शेअर्स आहेत," असं अयप्पन सांगतात.
 
 
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
 
याचिकाकर्त्या शालिनी पाटील यांचाही जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंध आहे. जरंडेश्वर साखर कारखाना लिलावात काढण्यापूर्वी हा कारखाना शालिनी पाटील यांच्यसह इतर काही सभासद चालवत होते.
 
शालिनी पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्या म्हणतात, "त्यावेळी सर्वकाही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडत होतं. त्यांनी कारखाने नाममात्र किमतीत विकले आणि त्यांच्याच नातेवाईकांनी ते विकत घेतले. पण या प्रकरणात पोलिसांनी योग्यपद्धतीने चौकशी केलेली नाही. त्यांनी महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केलं आहे. हिशेब चुकीचे केले आहेत."
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठमके असं सांगतात, "शालिनीताई पाटील यांनी जरंडेश्वर साखर कारखाना चालवण्यासाठी कर्ज काढलं. पण ते कर्ज त्यांना फेडता आले नाही. म्हणून 2009 मध्ये बँकेने कारखाना विक्रीला काढला आणि अजित पवारांनीच तो विकत घेतला. तेव्हा आघाडीचं सरकार होतं. त्यामुळे अजित पवारांनी सर्व प्रकरणावर आणि यंत्रणांवर दबाव आणला असाही आरोप आहे."
 
रोहित पवारांची चौकशी करा - सोमय्या
"महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेत पैशांचा घोटाळा करून शरद पवार परिवारानं असे अनेक कारखाने आपल्याकडे वळवले होते," असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
 
"रोहित पवार यांनी असाच एक सहकारी कारखाना महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेत पैशाचा घोटाळा करून ताब्यात घेतलाय. त्यांचा पण तपास व्हायला हवा, असा मी आग्रह ईडीकडे केला आहे," असंसुद्धा सोमय्या यांनी म्हटलंय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती