ब्रेक्झिट : राजीनाम्याची घोषणा करताना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना अश्रू अनावर

शुक्रवार, 24 मे 2019 (17:59 IST)
ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा मे या 7 जून रोजी आपला राजीनामा देणार आहेत. तोपर्यंत त्या पदावर कायम राहणार आहेत.
 
राजिनाम्याची घोषणा करताना मे भावूक झाल्या होत्या.
 
डाउनिंग स्ट्रीटवर बोलताना त्यांनी ब्रेक्झिटला मूर्त स्वरूप देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 2016 मध्ये घेण्यात आलेल्या जनमत संग्रहाचा आदर करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पण ब्रेक्झिटला पूर्ण करण्यात यश न आल्याबद्दल दुंःख होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
ब्रेक्झिटसाठी सर्वांचा पाठिंबा मिळवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही, आता नव्या पंतप्रधानांना ते करावं लागणार आहे, असं मे पुढे म्हणाल्या.
 
"मी या देशाची दुसरी महिला पंतप्रधान होते, पण शेवटची नक्कीच नाही. देशाचं पंतप्रधानपद भूषवणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे," असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
 
मे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पंतप्रधान निवडला जाईल आणि तोच आता ब्रेक्झिटबाबत पुढचा निर्णय घेईल.
 
असा आहे थेरेसा मे यांचा प्रवास
ब्रेक्झिटच्या कोंडीमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घटना ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा घडणार आहे. याआधी डेव्हिड कॅमेरून राजीनामा दिला आहे.
 
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा मे या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्याआधी मार्गारेट थॅचर या पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांची प्रतिमा ही आयर्न लेडी अशी होती.
 
थॅचर यांचं नाव इतिहासात अनेक कारणासाठी घेतलं जातं पण थेरेसा मे यांची ओळख थॅचरप्रमाणे राहणार नाही हे आता दिसतंय. त्यांचं कारण म्हणजे ब्रेक्झिटची कोंडी सोडवण्यास त्या असमर्थ ठरल्या आहेत.
 
जेव्हा त्यांनी 2016 साली पंतप्रधानपद स्वीकारलं तेव्हा त्यांच्यासमोर आव्हानं होती आणि त्यांना महत्त्वाकांक्षा देखील होत्या. त्यांना ब्रिटनच्या कानाकोपऱ्यात पोहचून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटावयाचा होता. त्यांनी त्यासाठी जे परिश्रम घेतले ते सर्व एकाच शब्दाच्या छायेखाली झाकोळले गेले आहेत. तो शब्द म्हणजे ब्रेक्झिट.
 
त्यांच्या कारकीर्दीतली तीन वर्षं कशी असावीत याचा निर्णय ब्रिटनच्या जनतेनेच आधी घेतला होता. जनतेनं कौल दिला होता की युरोपियन युनियनमधून आपण बाहेर पडावं आणि डेव्हिड कॅमेरूनने त्यावेळी राजीनामा दिला होता. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनची पुढची दिशा काय असेल हे ठरवण्यातच त्यांची तीन वर्षं खर्ची गेली.
 
त्यांच्या कारकीर्दीत त्यांना आपल्या अनेक सहकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारावे लागले. काहींनी बंडदेखील पुकारलं.
 
आपल्या आजूबाजूला गोंधळ होत असताना त्या सातत्याने म्हणत राहिल्या ब्रिटिशांनी जो कौल दिला आहे तो मी पूर्णत्वास नेईल पण अजून काहीच बदललं नाही. पण शेवटी त्यांना हार मानावी लागली.
 
जर 2017मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना बहुमत मिळालं असतं तर युरोपियन युनियनमधून बाहेर पडणं हे सोपं झालं असतं. पण त्या स्वबळावर सत्ता स्थापन करू शकल्या नाहीत. नॉर्थर्न आयर्लंड डेमोक्रेटिक युनियनिस्ट पार्टीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
 
ब्रेक्झिटचं वचन पूर्ण करण्यास थेरेसा मे कमी पडत आहेत, असं म्हणून त्यांच्या पक्षातले एक-एक खासदार राजीनामा देऊ लागले.
 
अनेक जण त्यांना एकटं पाडून त्यांची राजकीय कोंडी करू लागले. त्यांच्यासोबत काम करायची इच्छा नाही हे ते जाहीर करू लागले.
 
ब्रेक्झिटची कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी इतर पक्षांची मदत देखील मागितली, पण त्यांनी सादर केलेल्या मसुद्यावर एकमत होऊ न शकल्यामुळे त्यांचंदेखील सहकार्य मिळालं नाही. शेवटीही कोंडी सोडवू न शकल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा देण्याचाच निर्णय घेतला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती