गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. या यासाठी दोनापावला येथील राजभवनध्ये राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांना पत्र सादर केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात काँग्रेस आमदार तसेच पदाधिकार्यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री पर्रीकरांच्या निधनानंतर काँग्रेसने रात्री उशीरा सरकार स्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपाला डॉ. मृदुला सिन्हा यांना पाठवले होते. मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला भेटण्यासाठी वेळ दिला नसल्याने काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेवारा वाजण्याच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली.