Whatsappवर स्पॅम कॉलचा महापूर, यूझर वैतागले

गुरूवार, 11 मे 2023 (22:08 IST)
भारतातले व्हॉट्सअॅप वापरणारे आंतरराष्ट्रीय नंबरवरून येत असलेल्या स्पॅम कॉल्समुळे प्रचंड वैतागले आहेत.
 
अनेक भारतीयांनी आपल्याला अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
 
भारतातील व्हॉट्सअॅप वापरकर्ते अशा ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बहुतांश नागरिकांना दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांमधून असे कॉल प्राप्त होत आहे.
 
गेल्या काही दिवसांत अशा कॉलचं प्रमाण बरंच वाढल्याचं दिसून येतं.
भारतात तब्बल 48 कोटींपेक्षाही जास्त व्हॉट्सअॅपचा युझर आहेत.
 
"भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी अशा प्रकारच्या स्पॅम कॉल्सबद्दल एक सूचना जारी केली आहे.”
 
दरम्यान, व्हॉट्सअपनेही NDTV ला दिलेल्या निवेदनामार्फत आपल्या युझर्सनाही काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
 
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी आपल्या क्रमांकांची गोपनीयता बाळगावी. वैयक्तिक तपशील केवळ आपल्या मोबाईलमधील सेव्ह केलेल्या संपर्क क्रमांकांनाच दिसावा, अशी सेटिंग करून ठेवावी, असं त्यांनी सांगितलं.
 
व्हॉट्सअॅप कंपनीच्या प्रवक्त्याने टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं, “या खात्यांची व्हॉट्सअॅपवर तक्रार करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून आम्ही त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करू. या खात्यांना व्हॉट्सअॅपवर प्रतिबंधित करण्यात येईल.”
 
आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून व्हॉट्सअॅपने मार्च महिन्यात तब्बल 47 लाख खात्यांवर बंदी घातल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
शिवाय, वापरकर्त्यांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी कंपनीने एक मोहीम सुरू केली असून ऑनलाईन घोटाळे, फसवणूक आणि इतर धोक्यांबाबत त्यांना माहिती देण्यात येत आहे, असंही व्हॉट्सअॅपने सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती