राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. पण त्याचा निश्चित कालावधी आणि परिणामकारकता आताच सांगता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा महाराष्ट्राला तितकासा धोका नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.
डेल्टा प्लस व्हेरीयंटचा अभ्यास करण्यासाठी 7 हजार नमुने हे एनआयव्ही आणि नॅशनल सेंटर फॉर सेल्सकडे (NCC) पाठवण्यात आले आहेत. विषाणुंच्या जनुकीय रचनांचा अभ्यास करून राज्य सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरीयंट आढळलेल्या रुग्णात गंभीर लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मात्र, त्याचा काळ आणि परिणामकारकता आताच सांगणं अशक्य असल्याचेही डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.