कोरोना व्हायरस: AC असलेल्या खोलीत किंवा बंद खोलीत राहण्याने कोव्हिडचा धोका वाढतो?
रविवार, 23 मे 2021 (10:14 IST)
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, एरोसोल हवेत 10 मीटरपर्यंत उंच जाऊ शकतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी घरातल्या खिडक्या उघड्या पाहिजेत. जेणेकरून व्हेंटिलेशन नीट सुरू राहील.
ज्या घरात हवा येण्या-जाण्यासाठी नीट जागा असते, अशा घरात कोरोनाचा संसर्ग कमी होतो.
भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांमार्फत सल्ल्यांचं पत्रक जारी करण्यात आलंय. त्यात हे नमूद केलं गेलंय.
काही साध्यासोप्या गोष्टींमुळेही कोरोना संसर्गाची शक्यता कमी करता येऊ शकते, असं यात म्हटलंय.
तसंच पुढे असंही सांगितलंय की, "चांगलं व्हेंटिलेशन असेल, तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. खिडकी उघडी असल्यास वास कमी होतो, तसंच खिडकी आणि एग्जॉस्ट फॅनमुळे कोरोना संसर्गाची शक्यताही कमी होऊ शकते."
यामुळे व्हायरल लोड कमी होतो आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होते. घरात किंवा ऑफिसमध्ये व्हेंटिलेशन एखाद्या सामूहिक सुरक्षेप्रमाणे काम करतं.
केंद्र सरकारनं म्हणूनच नव्या सूचनांमध्ये ऑफिस, घर आणि सार्वजनिक ठिकाणांवर बाहेरील हवेच्या येण्या-जाण्याची व्यवस्था नीट असावी असं म्हटलंय.
ड्रॉपलेट्स आणि एरोसेल्स यांद्वारे कोरोनाचा विषाणू पसरतो. खोकला, थुंकणं किंवा बोलताना हे ड्रॉपलेट्स निघतात. जेव्हा एखादी व्यक्तीला संसर्ग होतो, तेव्हा ती या माध्यमातूनच इतरांपर्यंत पसरवत असते.
ज्या घरात एसीमुळे खिडक्या आणि दारं बंद असतात, तिथे कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. बंद खोलीत बाहेरील हवा येण्यास अडथळा येतो आणि यामुळे संसर्ग खोलीच्या आतच पसरत राहतो, असं केंद्राने म्हटलंय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ड्रॉपलेट्स म्हणजेच तोंडातून निघणाऱ्या सूक्ष्म थेंबांचा आकार 5 ते 10 मायक्रोमीटर असतो, तर एरोसेल्स 5 मायक्रोमीटरहून छोटे असतात. आकारात फरक असला, तरी दोन्हींची संसर्ग पसरवण्याची क्षमता मात्र प्रचंड असते.
क्रॉस व्हेंटिलेशन विषाणूचा संसर्ग रोखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. हॉस्पिटलना सुद्धा हेच सांगण्यात आलंय की, लसीकरणाच्या जागी क्रॉस व्हेंटिलेशन अनिवार्य करा.
गेल्या महिन्यात नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी संसर्गापासून वाचण्यासाठी रात मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला होता.
कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो की नाही, याबाबत अनेक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाले आहे. गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये प्रसिद्ध विज्ञान मासिक 'द लॅन्सेट'ने दावा केला होत की, कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो.
एमआयटीच्या संशोधनातूनही कोरोना हवेतून पसरत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. यात असंही म्हटलं होतं की, 6 फुटांचं अंतर राखणं महत्त्वाचं आहे.
हवेतून कोरोना पसरण्याच्या अहवालांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा आपली बाजू मांडली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं की, "आतापर्यंतच्या पुराव्यांवरून हेच दिसतं की, कोरोनाचा संसर्ग दोन व्यक्तींच्या संपर्कामुळे होतो. हा संपर्क एका मीटरच्या अंतरामुळेही धोकादायक आहे. एखादी संसर्ग झालेली व्यक्तीचे एरोसोल्स किंवा ड्रॉपलेट्स दुसऱ्या व्यक्तीच्या डोळे, नाक किंवा तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकतात."
"विषाणू असलेली भिंत किंवा पृष्ठभाग यांना स्पर्श केल्यास संसर्ग पसरत आहे. पृष्ठभाग किंवा भिंतीला स्पर्श केल्यानंतर लोक आपली बोटं नाक, डोळे किंवा चेहऱ्यापर्यंत घेऊन जातात आणि यामुळे संसर्ग होतो," असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.