कोरोना लसीकरण: लहान मुलांना लस देणं फायदेशीर की धोकादायक?
शनिवार, 22 मे 2021 (18:24 IST)
जेम्स गॅलाघर
लहान मुलांना लस देणं सर्वमान्य आहे आणि बहुतांश आजारांमध्ये त्यांना दिलीही जाते. पोलिओ, गोवर, गालगुंड, घटसर्प, रोटाव्हायरस यांच्यासह मेनिनजायटिस, कफ ही यादी वाढती आहे.
काही देशांनी यासंदर्भात पावलं उचलली आहेत. अमेरिकेने 12ते 15 वयोगटातल्या 600,000 मुलांना कोरोनाची लस दिली आहे. या लशीच्या परिणामकारकेतसंदर्भात माहिती जमा झाल्यानंतर यापेक्षा लहान वयोगटाच्या मुलांनाही लस देण्यात येणार आहे.
युकेत प्रौढांना लस देण्याचं काम सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत युकेतील 18 वर्षांवरील नागरिकांना लशीचा पहिला डोस मिळालेला असेल असं त्यांचं उद्दिष्ट आहे. मात्र लहान मुलांना लस द्यायची की नाही यासंदर्भात निर्णय झालेला नाही.
यामागे एक शास्त्रीय प्रश्न आहे. लहान मुलांचं लसीकरण केल्याने त्यांचा जीव वाचू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे. प्रत्येक देशागणिक परिस्थिती वेगवेगळी आहे. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लशीचे डोस आरोग्य सेवकांना तसंच ज्यांची स्थिती गंभीर आहे अशा वृद्धांना देण्यात आली तर त्यांचा जीव वाचला असता असा एक नैतिक युक्तिवाद आहे.
मुलांमध्ये कोव्हिडची शक्यता अत्यंत कमी
लहान मुलांना कोरोनाची लस दिली तरी त्यांना त्याचा फारसा उपयोग नाही. सुदैवाने कोरोनाबाबत चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना कोरोनाची शक्यता अत्यंत कमी आहे असं प्राध्यापक अडम फिन यांनी सांगितलं. युकेच्या लसीकरण कार्यक्रमाचा ते भाग आहेत.
लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं आढळतात. काहींमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. कोरोना संसर्गासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत हा खूपच मोठा फरक आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात आलं.
लॅन्सेटमध्ये या प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन मासिकात प्रकाशित लेखानुसार, सात देशांमध्ये तौलनिक अभ्यास करण्यात आला. दशलक्ष मुलांमागे दोन मुलांचा मृत्यू ओढवू शकतो असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
ज्या मुलांना काही व्याधी आहेत, ज्यामुळे त्यांच्या पालकांना कोरोना होऊ शकतो अशांचंही युकेत सध्या लसीकरण करण्यात आलेलं नाही. धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या किंवा कोरोना होण्याची शक्यता सर्वाधिक आहे अशा मुलांना तसंच गंभीर आजार असलेली आणि आरोग्यसुधार केंद्रात राहणाऱ्या मुलांची शिफारस लसीकरता करण्यात आली आहे.
लस अतिशय सुरक्षित आहे मात्र धोका आणि फायदे यांचा साकल्याने विचार व्हायला हवा.
लहान मुलांना लस देण्याचे फायदे
लहान मुलांना लस दिली तर त्याचे काही फायदे आहेत. ते म्हणजे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अन्य लोकांचा जीव वाचू शकतो.
फ्ल्यूचा फैलाव झाला तेव्हाही लहान मुलांचं लसीकरण करण्यात आलं होतं. दोन ते बारा वयोगटातल्या मुलांना नेसल स्प्रे देण्यात आला. जेणेकरून त्यांच्या आजीआजोबांना कोणताही धोका निर्माण होऊ नये.
लहान मुलांना कोरोना लस देण्याचा एक युक्तिवाद असा केला जातो की त्यामुळे हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत होईल. अनेक लोकांना लस मिळालेली असेल तर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.
कोरोना ज्या वेगाने पसरतो त्या वेगाला थोपवायचं असेल तर लस हाच सर्वोत्तम उपाय आहे. लशीच्या एका डोसनेही कोरोना होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते. ज्यांना पहिल्या लशीनंतर कोरोना होतो, त्यांच्यामार्फत अन्य लोकांना होण्याची शक्यताही कमी होते.
लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची शक्यता कमी आहे. परंतु कुमार आणि किशोर वयाच्या मुलांच्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो.
युकेत लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यानच्या काळात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने रोगप्रतिकारक क्षमतेचा मुद्दा निर्माण झाला.
लोकसंख्येच्या एक तृतीयांश असलेले सोळा तसंच सतरा वर्षीय मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्याचं लसीकरण झालेलं नाही हे विशेष.
त्यामुळे लहान मुलांना कोरोनापासून लसीविनाच रोखलं जाऊ शकतं असा विश्वास युके आणि परिसरातील देशांना वाटू शकतं.
ज्या देशात कोरोनाच्या लाट्या आलेल्या नाहीत, प्रौढांमध्येही कोरोनाचा संसर्ग मर्यादित प्रमाणित आहे, त्या ठिकाणी लहान मुलांचं लसीकरण न करणं योग्य ठरणार नाही असं डॉ.कुचारर्स्की यांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियात लशीला विरोध होतो आहे. न्यूझीलंड आणि तैवानने इतक्या प्रभावीपणे कोरोनाला आटोक्यात आणलं की लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही.
लहान मुलांना लस देण्याचं प्राधान्य नैतिकदृष्ट्या किती योग्य?
विकसित देशांनी लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम पुढे ढकलावा आणि तो निधी अन्यत्र वळवावा असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका लशीसाठी क्लिनिकल ट्रायल आयोजित करण्यात सहभाग असलेले डॉ. अँड्यू पोलार्ड म्हणाले की लहान मुलांना लस देणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे.
लहान मुलांना लस देण्याची घाई करायला नको याचं कारण आहे. लशींचा अखंडित पुरवठा होत असता तर गोष्ट वेगळी पण तशी परिस्थिती नाही असं डॉ. एलेनॉर रिले यांनी सांगितलं.
लहान मुलांना लस द्यायची की जगभरात मृत्यूच्या विळख्यात अडकलेल्या वृद्धांना द्यायची हा एक राजकीय निर्णय आहे.