योगगुरू रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली योगपीठातील व्याख्यानात बोलताना अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जातोय.
"रामदेव बाबा यांचा पतंजली आयुर्वेदिक औषधींच्या व्यवसाय आहे. त्याची कोट्यावधीची उलाढाल आहे. त्यामुळे एकप्रकारे ते अॅलोपॅथीला बदनाम करून, त्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण करून स्वतःच्या व्यवसायासाठी संधी साधत आहेत," असा आरोप केला जातोय.
रामदेव बाबांविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए ने नाराजी व्यक्त करत, एक पत्र केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलंय.
IMA ने या पत्रात म्हटलंय की, "योग गुरुजी आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण हे स्वतः आजारी पडले की अॅलोपॅथीची औषधं घेतात, हे सर्वांना ठाऊक आहे. आता ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्यं करत आहेत, जेणेकरून त्यांच्या मान्यता प्राप्त नसलेल्या औषधींचा खप वाढेल."
IMAने या पत्रात दोन प्रश्न उपस्थित केलेत.
एक म्हणजे, "आजवरच्या आधुनिक अॅलोपॅथिक औषधींवर त्यांनी शंका उपस्थित करून भारताच्या DCGI, AIIMS आणि आरोग्य मंत्रालयाच्या कामकाजावर, प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशात जर लोकांच्या मनात या उपचारांविषयी शंका आणि भीती निर्माण झाली, तर हे कृत्य देशविरोधी नाही का?"
दुसरा प्रश्न म्हणजे, "आजवर सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेबाबत वेळोवेळी काही निर्णय दिले आहेत. मग लाखो अनुयायी असलेल्या एक मोठी व्यक्तीने अशी वक्तव्यं करणं कोर्टाचा अवमान ठरत नाही का?"
IMA ने या पत्रात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उद्देशून म्हटलंय की, ते सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये.
"एक तर तुम्ही या वक्तव्याचा निषेध करावा किंवा त्यांना समर्थन द्यावं. जर आरोग्यमंत्र्यांनी यावर काहीच केलं नाही, तर आम्ही कोर्टाची दारं ठोठावायला बांधील आहोत," असंही IMA ने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलंय.
दुसरीकडे, ट्विटरवरील एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या द्वारका विभागनं म्हटलंय की, ते आम्ही अवमान याचिका आणि FIR सुद्धा दाखल करत आहोत.
आता रामदेव बाबा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची या सर्व प्रकरणावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाते ठरेल.