महाराष्ट्र सत्तासंघर्ष : भाजप विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार पण आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याची त्यांची तयारी नाही - शिवसेना
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काल भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सकाळी 11 वा. 59 मिनिटं
कोण कसं सरकार स्थापन करेल हा मुद्दा नाही. मात्र राज्यात अस्थितरेची शक्यता नाकारता येत नाही. पुडे निवडणुका झाल्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर लढणार का? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे. राज्यात 2020 मध्ये निवडणुका होतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सकाळी 11 वा. 15 मि.
भाजपच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काही वेळात सुरुवात होणार.
सकाळी 10 वा. 49 मिनिटं
शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला मुंबईत सुरुवात. महत्त्वाचे नेते उपस्थित. बदलत्या राजकीय परिस्थितीत कोणत्या पक्षाने कुणाबरोबर जावं हा इतका साधा प्रश्न नाही. कारण अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात. आमची कुणाबरोबर चर्चा झालेली नाही. बदलत्या परिस्थितीत आज जे प्रश्न निर्माण झाले यावर आम्ही चर्चा करणार असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
सकाळी 10 वा. 46 मिनिटं
दिल्लीत काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीला मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती.
सकाळी 9 वा. 56 मिनिटं
तुमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी आहे पण आमच्यासोबत चर्चा करण्याची तुमची तयारी नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तासांची मुदत दिली होती तर आम्हाला केवळ 24 तासांची मुदत दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं. असं असलं तरी आम्हाला राज्यपालांविषयी तक्रार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भारतातलेच पक्ष आहेत. त्यांच्याशी आमचे मतभेद आहेत पण ते काही देशद्रोही नाहीत असं संजय राऊत म्हणाले.
भाजपने काश्मीरमध्ये पीडीएफशी हातमिळवणी केली तेव्हा त्यांचे कुठे विचार सारखे होते पण ही आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या आधारावर एकत्र येणार आहोत.
सकाळी 9 वा. 54 मिनिटं
"शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडावं, अशी आमची पहिली अट होती. आता पुढचा निर्णय घेण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू. काँग्रेसनंही त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता ही मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडेल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अरविंद सावंत यांचा राजीनामा
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. यासंदर्भात दिल्लीत 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे. अरविंद सावंत शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे खासदार आहेत.