लोकसभेवेळी जे ठरलंय, ते व्हावं. बाकी काही काही अपेक्षा नाही. मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपाने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीच वाढला असून सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपासमोरील अडचणी कायमच आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीत भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना आमदारांची बैठक गुरूवारी मातोश्रीवर झाली. त्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आपल्या पक्षाचं निर्णाण स्वाभिमानातून झालं आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको.”