वारी पंढरीची असा सोहळा जो पारंपरिक आहे आणि महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वाचा सण, वारकरी आपापल्या शहरांमधून गावांमधून पंढरीचा पायी प्रवास सुरू करतात काही वारकरी काही अंतर करिता वारीमध्ये सहभागी होतात. एकंदरीत काय तर विठू माउली वरील आपला भक्तिभाव आणि प्रेम प्रकट करतात. ही संधी मला देखील मिळाली अशी खूप वर्षांपासून माझी इच्छा होती, जी ह्या वर्षी पूर्णं झाली.
मे-२०१९ मध्ये काही कामानिमित्त मी माझ्या मूळ गावी म्हणजेच आपल्या इंदूर (मध्य प्रदेश) ला आलो होतो. इंदूरला माझे आतोबा श्री ओम नम्र त्यांच्याकडून मला श्री क्षेत्र गोंदवले ते श्री क्षेत्र पंढरपूर या दरम्यान होणाऱ्या पायी वारीची माहिती मिळाली.
जून 2019 च्या शेवटच्या आठवड्यात मी माझ्या काकांना वारी करिता विचारपूस करण्यासाठी संपर्क केला होता तेव्हा त्यांनी माझे आणि माझ्या आईचे नाव वारी करता नोंदवून घेतले वारी पंढरीची सुरू होणार होती रविवार दिनांक 7 जुलै 2019 आणि पूर्ण होणार होती शुक्रवार 12 जुलै 2019 रोजी. साधारण एक आठवड्याची ऑफिस मधून सुट्टी घेणं थोडं कठीण वाटत होतं कारण प्रोजेक्ट शेड्यूलचा प्रभाव जास्त होता, परंतु “ देव तारी त्याला कोण मारी ”, या वेळेस खर्या अर्थी पांडुरंगाची कृपा होती आणि कठीण वाटणारी माझी सुट्टी कुठलाही अडथळा न येता मंजूर झाली. सुट्टीचे नियोजन होताच आम्ही ट्रेनचे नियोजन केले. मुंबईहून गोंदवले हे बस नी किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे सर्वात चांगले, परंतु आम्ही ट्रेन ने जाण्याचा विचार केला ट्रेनने जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे जुलै महिन्यात मुंबई मध्ये असणारा जोरदार पाऊस आणि होणारे ट्राफिकचा त्रास !!!!!
शनिवार दिनांक 6 जुलै 2019 रोजी आम्ही ठाणे होऊन कोल्हापूर कडे जाणारी कोयना एक्सप्रेस घेतली सकाळी साधारण 9:20 च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावर पूर्ण झाला. कोरेगाव रेल्वे स्थानकापासून एसटी स्टँड हे साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे ज्यासाठी रिक्शा उपलब्ध आहेत आणि एसटी स्टँड पासून तुळजापूर किंवा पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेस गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठाकडे जातात. सर्व प्रवास व एसटीच्या वाट बघण्याची वेळ धरून आम्ही साधारण सायंकाळी सातच्या सुमारास गोंदवले ला पोहोचलो. गोंदवले संस्थानात राहायची सोय झाल्यावर लगेचच रात्रीच्या भोजनास प्रारंभ झाला महाराजांची पालखी रविवार दिनांक 7 जुलै 2019 रोजी सकाळी 8.30 मिनिटांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार होती. वारीचा पायी जाण्याचा मार्ग हा खालील प्रमाणे-
१. रविवार, ७ जुलै 2019 :- गोंदवले संस्थान ते म्हसवड (साधारण अंतर 25 किलोमीटर)*
२. सोमवार, ८ जुलै 2019 :- म्हसवड ते पिलीव (साधारण अंतर 21 किलोमीटर)*
३. मंगळवार, ९ जुलै 2019 :- पिलीव ते भाळवणी (साधारण अंतर 20 किलोमीटर)*
४. बुधवार, १० जुलै 2019 :- भाळवणी ते श्रीक्षेत्र पंढरपूर (साधारण अंतर 25 किलोमीटर)*
*एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. दिलेली अंतरे ही त्या गावांमधील राहण्याच्या सोयीच्या जागेपर्यंत दिलेली आहेत. दिलेल्या अंतरामध्ये मधील काही प्रवास जो जेवणाच्या स्थानापर्यंत किंवा मंदिरापर्यंत असे जर सर्व एकत्र केले तर ९१ किलोमीटर अंतर होते आमच्या पंढरपुरातील निवास हा इसबावी पंढरपूर येथे होता. पंढरपुरातील निवासस्थान म्हणजेच इसबावी हे माउलीच्या मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे परतीचा प्रवास म्हणजेच निवास ते माउलीचे मंदिर हा साधारण १० किलोमीटरचा होतो. हे सर्व मिळून पूर्ण प्रवास १०१ किलोमीटरचा होतो जो देवा कृपेने पायी चालत सर्व गोंदवले ते पंढरपूर प्रवास करणारे वारकरी पूर्ण करतात.
रविवार, ०७ जुलै 2019 :- गोंदवले समाधी मंदिर ते म्हसवड. (साधारण अंतर 25 किलोमीटर)
नियोजनाप्रमाणे गोंदवले समाधी मंदिराच्या समोर श्रींची आरती झाली. आरती झाल्यावर विठूरायाच्या नामघोषात पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थान झाले.
पालखीसोबत बऱ्याचशा दिंड्या सोबत पंढरीच्या दिशेने पायी जाऊ लागल्या. तत्पूर्वी गोंदवले संस्थानातर्फे सर्व वारकऱ्यांसाठी बेसन भाताचा प्रसाद ठेवण्यात आला होता पालखी प्रस्थानापूर्वी सर्व वारकऱ्यांना हा प्रसाद देणे ही संस्थानाची एक परंपराच आहे गोंदवले मंदिरातून आम्ही साधारण तीन हजार वारकरी होतो. आमची दिंडी ही सोबत असल्याने आमच्या दिंडीत आम्ही २० वारकरी होतो ज्यामध्ये माझी आई श्रीमती सुनीता पद्माकर कस्तुरे व सौ सुजाता कुळकर्णी (निवास - इंदूर) ह्या महिला वारकरी होत्या.
गोंदवले मंदिरातून प्रवास सुरू झाला आणि साधारण अर्धा किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यावर स्थानिक गावकऱ्यांनी सर्व वारकऱ्यांसाठी मोफत पाण्याच्या म्हणजेच बिसलेरीच्या बाटल्या आणि जिलबीचा प्रसाद वाटप केले. गावकऱ्यांचे सहकार्य आणि “माउली” म्हणून वारकऱ्यांना संबोधण्याची पद्धत ही फारच भारावून टाकणारी होती.
महाराजांच्या पालखी सोबत “ज्ञानोबा-तुकाराम” असा जप सारखा सुरू असे. आम्ही २० वारकरी हे महाराजांच्या दिंडीच्या थोडे पुढे चालत होतो आणि श्री मिलींद इनामदार (राहणार चिंचवड पुणे) हे अभंगात टाळ वाजवून ताल देत होते.
रस्त्यात चालत असताना आजूबाजूच्या गावातील बऱ्याचशा दिंड्या सोबत येऊ लागल्या आणि हळू हळू रस्त्यावर वैष्णवांच्या ध्वजा, तुळशीमाळा घातलेले वारकरी दिसू लागले. पुण्यामधील चिंचवड येथे स्थायिक असलेले श्री शिवप्रसाद करमरकर जे एक उत्कृष्ट पखवाज वादक देखील आहेत ते भजन म्हणत होते. त्यांच्या भजनांना आम्ही कोरस साथ देत होतो. साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यावर गोंदवले खुर्द येथे गावकर्या तर्फे दूध वाटप सुरू होते सर्व वारकऱ्यांना अर्थातच माउली म्हणून आवर्जून दुधाचा कप देत होते. दूध प्राशण केल्यानंतर आलेला उत्साह हा लगेचच फुगड्यांच्या रूपात बदलला, मग पुरुष वारकरी असोत वा महिला वारकरी सर्वच फुगड्या घालू लागले.
फुगड्या आणि विठुनामाचा गजर याने जणू आसमंतच फुलून गेला महाराष्ट्राची परंपरा जणू आपले अस्तित्व त्या वेळेस दाखवत होते. विठ्ठलाची गाणी आणि भजन म्हणताना नाचायचा आनंदही घेता आला.
पुढे प्रवास सुरू असताना दुपार झाली आणि “वाण्याची झाडी” येथे महाराजांची पालखी थांबली येथेच आरती झाल्या नंतर व महाराजांना प्रसाद दाखवल्या नंतर सर्व वारकऱ्यांना जेवण देण्यात आले. पालखीतल्या नियमाप्रमाणे सर्व वारकऱ्यांना जर प्रसादाचा लाभ घ्यायचा असल्यास स्वतःची ताट वाटी सोबत आणावी लागते. त्या दिवशी दुपारच्या भोजनात भाकरी खीर व वांग्याची चविष्ट अशी भाजी होती. भोजनानंतर जवळच्याच शेतात थोडा आराम केला व पुन्हा म्हस्वड च्या दिशेने प्रयाण केले. पायी प्रवासाचा पहिला टप्पा हा साधारण २५ किलोमीटरचा असल्याने थोड्या थोड्या वेळाने पायांना विश्रांती देणे हे फार गरजेचे होते. सोबत चाललेल्या अनेक दिंड्यांमध्ये सोबत ट्रक सुद्धा होते. या ट्रकमध्ये त्या दिंडी मधील वारकरी आपले-आपले सामान, धुतलेले कपडे वगैरे वाळत घालतात. तसेच सोबत असणाऱ्या अबाल वृद्धांना थोडा आराम करण्याची सोय सुद्धा असते.
प्रत्येक दिंडी मधील ट्रक किंवा सोबत आणलेले वाहन हे दिंडी पासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असते हे वाहन दिंडीच्या रस्त्यात पुढे असल्याने प्रत्येकजणास (गरज पडल्यास) या वाहनात अधून-मधून जाऊन बसता येते. आमचा पहिल्या दिवसाचा टप्पा हा थोडा मोठा असल्याने पायांचे दुखणे थोडे जाणवू लागले होते. परंतु “ मनी रंगला श्रीरंग ” या एका विचाराने त्या श्रीरंगाला म्हणजेच विठोबाला स्मरत त्याचे नामस्मरण करत म्हस्वड पर्यंतचे 25 किलोमीटरचे अंतर दिवसाच्या उत्तरार्धात पूर्ण झाले. म्हसवडला या वर्षी महाराजांच्या दिंडीचे रात्रीचे भोजन श्री बापूसाहेब माने म्हस्वड यांच्याकडे करण्यात आले होते व रात्रीचा मुक्काम श्री दादासाहेब नरळे ह्यांच्या कडे करण्यात आली होती.
आमच्या दिंडी मध्ये साधारण २० लोक असल्याने म्हस्वड ला एका गेस्ट हाउस मध्ये आम्ही सर्व वास्तव्यास होतो. महाराजांच्या दिंडीमध्ये कधी शाळा, तर कधी गेस्ट हाउस तर कधी कार्यालयात सर्व वारकऱ्यांच्या राहण्याची सोय केली जाते. गोंदवले मठाद्वारे सर्व वारकऱ्यांची निवास व जेवणाची सोय उत्तमोत्तम व्हावी ही पूर्ण काळजी घेतली जाते. टँकरद्वारे अंघोळ व शौच यासाठी पाणी पुरविले जाते. वारकऱ्यांनी अर्थात थोडी गैरसोय होऊ शकते या मानसिकतेने वारीमध्ये येणे चांगले संस्थानातर्फे सर्व सोय केलेली असली तरीही साधारण ३००० ते ५००० लोक असल्याने थोडीफार गैरसोय झाल्यास वारकऱ्यांनी त्याचा त्रागा न करणे हे सर्वात चांगले. अर्थात आपण पंढरीच्या राजाचे दर्शन घ्यायचे या विचारसरणीने आले की गैरसोयीचा विचार देखील मनात येत नाही. सर्व वारकऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या आधी तयार राहावे लागते, कारण नित्यनियमाने सकाळी ठीक सात वाजता वारीचे पुढील प्रवासाच्या दृष्टीने आगेकूच सुरू होते.
सोमवार, ८ जुलै २०१९ :- म्हस्वड ते पिलीव (साधारण अंतर २१ किलोमीटर)
रात्रभराच्या विश्रांती नंतर सकाळचे प्रातर्विधी उरकून आमची पिलीवच्या दिशेने दिंडीची सुरुवात झाली. रविवारी दिवसभर चालण्यामुळे आलेल्या थकव्याला रविवारी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी केलेल्या तेल मालीश मुळे पायांना फार चांगला फरक जाणवत होता. पायाचा भाग गुडघ्यापासून तेलाने मालीश केल्यामुळे रक्ता अभिसरण पायाकडे व्यवस्थित होते आणि पायाला होणारा त्रास हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. रविवारच्या चालण्यामुळे पावले आणि चप्पल मध्ये झालेल्या घर्षणामुळे थोडा तळव्याच्या जवळ फोड आल्यासारखे वाटत होते त्यामुळे रात्री बेटाडीन लावून सकाळ पर्यंत फोड किंवा छाला हा बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. शेवटी सोबत नेले बूट उपयोगात आले आणि दुसऱ्या दिवसापासून चालणे सोपे झाले. पंढरीच्या वारीत पादत्राणे निवडीच्या दृष्टीने आलेला हा एक अनुभवच होता. वारीला जाताना नेहमी वापरलेले कपडे व पादत्राणे वापरणे सर्वात चांगले, नवीन कपडे व पादत्राणे हे बऱ्याचदा कासलं गेल्यामुळे त्रास देतात आणि फोड अथवा छाले हा पुढचा प्रवास कठीण करतात. वारीत शक्यतो पर्यंत पुरुषांनी पांढराशुभ्र सदरा आणि पांढरा पायजमा परिधान करणे हे सर्वात चांगले, महिला वारकऱ्यांनी साडी अथवा एखादा चांगला ड्रेस परिधान करणे सर्वात चांगले.
म्हसवड येथे वारकऱ्यांचे रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी होते म्हस्वड पर्यंत बरेचसे वारकरी सोबत चालतात आणि गोंदवले ते म्हस्वड हे अंतर पूर्ण झाले की आपल्या-आपल्या घरी प्रस्थान करतात. वारीमध्ये आपला खारीच्यावाट्या एवढा सहभाग का असेना म्हणून बरेचसे लोक गोंदवले ते म्हस्वड हे अंतर आवर्जून पाणी पूर्ण करतात, परंतु नंतर म्हस्वडहून पंढरपूर पर्यंत चालणाऱ्या वारकरीं करिता रजिस्ट्रेशन बंधनकारक असते. रजिस्ट्रेशन झाले की सर्व वारकऱ्यांना एक ओळखपत्र देण्यात येते. म्हस्वड पासून नोंदणी झालेल्या सर्व वारकऱ्यांना जेवणाचे कुपन देखील देण्यात येतात हे कुपन दाखवून पुढच्या प्रवासात महाराजांच्या दिंडी मधील भोजनाचा आस्वाद अथवा आनंद घेता येतो.
म्हस्वडहून आमच्या पायी वारीची सुरुवात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास झाली. साधारण दोन किलोमीटर अंतर पूर्ण झाले आणि आम्हाला गावकर्या तर्फे उप्पीट देण्यात आले. येथेच सकाळी सर्व रस्त्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना केळी वाटप सुद्धा करण्यात आले. मला येथेच रस्त्यात एका माउलीने टिळा लावला, शेंदूर आणि बुक्का देखील लावला. “ मस्तकी चंदनाचा टिळा ” या वाक्याची आठवण झाली.
निस्वार्थपणे दान करण्याची महाराष्ट्रातील परंपरा ही वारीच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवते. ज्या गावांमधून दिंडी जाते या गावांमधून त्या गावातले गावकरी चहा, पाणी, दूध, पोहे, उप्पीट असे सर्व पदार्थ निःशुल्क वाटप करीत असतात. रस्त्यातून पुढे जात असताना जवळील गावातली एक दिंडी थांबलेली दिसली व आम्ही त्या दिंडीत जाऊन त्यांच्यासोबत थोडा वेळ सहभागी झालो. त्यांच्यासोबत आमच्या दिंडीतल्या महिला वारकऱ्यांनी तुळशी आपल्या डोक्यावर ठेवण्याची संधी सोडली नाही तसेच त्यांच्या सोबत आणलेल्या वीणेला स्पर्श करणं हे माझ्यासाठी फारच भाग्याचे होते.
सकाळी म्हस्वड होऊन श्री सिद्धनाथाचे दर्शन करून निघालेल्या पालखीचे दुपारी अकराच्या सुमारास सुळे वस्ती येथे आगमन झाले. पालखीचा येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुक्काम होता, येथेच श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ नातेपुते यांचा भजनाचा कार्यक्रम झाला व येथेच सर्व वारकऱ्यांना भोजन प्रसाद, श्रींच्या आरतीच्या नंतर देण्यात आला. ही सर्व सोय गावकरी अथवा प्रसाद देणाऱ्या व्यक्ती द्वारे केली जात होती त्यामुळे प्रसाद घेताना बऱ्याचदा शेतात रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या आडोशाच्या जागी देखील बसावे लागत होते. परंतु सर्वांना सद्बुद्धी देणारा तो विठूराया भक्तांच्या चेहऱ्यावर नेहमीच समाधान ठेवत होता. दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान श्री अंबाबाई मंदिर पिलिव येथे भजन झाले. आम्ही देखील प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर पिलीवचा दिशेने पुन्हा प्रस्थान केले भोजनाची जिथे सोय होती ती जागा खुद्द पिलीव गावापासून साधारण ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असल्याने भोजनानंतरचा पुढचा प्रवास सुरू करणे जास्त सोईस्कर राहिले.
पिलीव येथे प्रवासात असतानाच वरूणराजाने कृपा दाखविली आणि खूप जोरात पावसाच्या सरी बरसू लागल्या. छत्री अथवा रेनकोट काढायच्या आतच आम्ही भिजलो अर्थात अचानक आलेल्या पावसात भिजणे हेदेखील खूप आनंददायी होते पावसाच्या आलेल्या सरींचा आनंद लुटल्यानंतर पुन्हा आम्ही पिलीव च्या दिशेने प्रस्थान सुरू ठेवले. पिलीव हे गाव सोलापूर जिल्ह्यात येते. पिलीवला आमच्या दिंडी ची व्यवस्था एका शासकीय गेस्ट हाउस मध्ये करण्यात आली होती, परंतु त्या दिवशी त्या गेस्ट हाउसमध्ये अगदी थेंबभर देखील पाणी नसल्याने अगदी शेवटपर्यंत आम्हाला थोडी राहायची सोय शोधण्यास प्रयत्नशील राहावे लागले. परंतु “देवाक काळजी ” जे म्हणतात ते खरंच आहे या वाक्याची प्रचिती आम्हाला येईल याचा अंदाज देखील आम्हाला नव्हता. आमच्या वारीसोबत आलेल्या ओमनी वाहनचालकाच्या एका नातेवाइकाच्या घरी राहण्याची आम्हाला संधी मिळाली. चालकाच्या निव्वळ एका फोनवर त्या माउलीनं २० जणांची राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली महाराजांच्या पालखी सोबत टँकर सुद्धा असल्याने महाराजांच्या दिंडी मधील वारकऱ्यांनी त्या टँकरच्या पाण्यात प्रातर्विधी उरकले. आमच्या दिंडीची सोय ही त्या माउलीच्या घरी झाली. एवढी मोठी असलेली जबाबदारी लीलया पेलणाऱ्या या कुटुंबाला आम्हा सर्व वारकऱ्यांचा शतशः प्रणाम.
मंगळवार 9 जुलै 2019 :- पिलीव ते भाळवणी साधारण अंतर २० किलोमीटर
पिलीव येथे रात्रीचा मुक्काम करून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्ही भाळवणी करिता प्रस्थान केले. महाराजांची पालखी व दिंडी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी भाळवणी च्या दिशेने मार्गस्थ झाली होती, आम्ही थोडे मागे होतो म्हणून सकाळी मार्गस्थ होऊन पाउले थोडी लवकर वाढवत मार्गक्रमण करू लागलो. आदल्या दिवशी झालेल्या पावसाने वातावरणातला उष्मा बऱ्याच प्रमाणात कमी केला होता. भाळवणी च्या मार्गक्रमणात आमच्या सोबत अजून एक पालखी आली आणि याच दरम्यान एका गावात या पालखी मधील बुवांचे आणि तुळशी आपल्या डोक्यावर ठेवून चालणाऱ्या महिला वारकरी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या पालखी मधील वारकऱ्यांना त्या माउलीनं घरी बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला हा क्षण डोळे दिपवणारा होता. विठू माउली भक्तमंडळींना दर्शनाला बोलवतं असताना त्यांचा कृपा आशीर्वादच जणू या सोहळ्याद्वारे होत असतो. साळमुख ते तांदुळवाडी या मार्गावर महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा होणार होता, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर तांदुळवाडी च्या दिशेने प्रस्थान सुरू ठेवले होते. अखेरीस तांदूळ वाडीत रिंगण सोहळ्याचा आनंद आम्हाला घेता आला.
रिंगण सोहळा:- रिंगण सोहळा म्हणजे नक्की काय? रिंगण म्हणजे दिंडी मधील पालखीला वारकऱ्यांनी घातलेली एक प्रदक्षिणाच होय. रिंगण सोहळ्यात पालखीला मध्यभागी ठेवून सर्वप्रथम झेंडा आणि पताकाधारी वारकरी हे महाराजांच्या दिंडी भोवती गोल प्रदक्षिणा करतात. त्यानंतर वीणाधारी बुवा व तुळशी वृंदावन डोक्यावर ठेवून आलेल्या महिला वारकरी हे त्या रिंगणा भोवती गोलाकार प्रदक्षिणा करतात. या सर्वात ज्ञानबा-तुकाराम असा जप चालू असतो सोबत माउली माउली असा उच्चार सुरू असतो. यानंतर महाराजांच्या संस्थानातर्फे असणारा घोडा पूर्ण रिंगणामध्ये गोल धावतो. असे एकंदरीत क्रमाक्रमाने ध्वजधारी वारकरी वीणाधारी बुवा तुळशी वृंदावन धारी महिला वारकरी आणि महाराजांचा घोडा हे सर्वच पालखीला प्रदक्षिणा करतात हे सर्व पूर्ण झाले की रिंगण सोहळ्याचे समापन होते.
रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर सकाळी साधारण अकरा ते एक पर्यंत ह.भ.प. धैर्याशिल भाऊ देशमुख (राहणार नातेपुते) यांची नारळीबाग तांदुळवाडी येथे प्रवचन सेवा सुरू झाली. दुपारचे जेवण झाल्यानंतर भाळवणी च्या दिशेने आमचा बाकी असणारा साधारण दहा किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. भाळवणी ची वाट ही रस्त्याचे काम सुरू असल्याने थोडी चिखलाची होती. भाळवणी पासून साधारण दोन-तीन किलोमीटर अंतर बाकी असताना पुन्हा एकदा वरूणराजाने कृपा दाखवली आणि पुन्हा आम्ही पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेतला. भाळवणी ला पोहोचल्यावर एका शाळेमध्ये महाराजांच्या पालखीचा मुक्काम ठेवण्यात आला होता त्या शाळेच्या जवळच एका साखर कारखान्याचे गेस्ट हाउस होते, हेच गेस्ट हाउस आमचे भाळवणी मधील मुक्काम स्थान बनले. आमच्या मुक्कामाच्या शेजारच्या खोलीत अक्कलकोट हून आलेल्या वारकऱ्यांची वारी थांबली होती. त्यांच्या सोबत एक भजनाचा कार्यक्रम झाला.
माउलीच्या कृपेने मला देखील त्या कार्यक्रमात २ भजने म्हणण्याची संधी मिळाली. “विठू माउली तू माउली जगाची” हे माझे भजन पूर्ण झाले आणि त्यानंतर भजनी मंडळांनी भैरवी गाऊन त्या दिवसाच्या भजनाचा कार्यक्रम पूर्ण केला. विठ्ठलाची भजनं म्हणूनच माझ्या गळ्याला गायनाची सवय लागली आणि त्यांचे भजन वारीमध्ये म्हणायला मिळायची संधी ही माझ्यासाठी खरंच भारावून टाकणारी गोष्ट होती. भाळवणी येथे श्री विठ्ठल आणि माय रुक्मिणीचे एक अप्रतिम मंदिर आहे. या मंदिरात मला विठूरायाच्या चरणी माथा टेकण्याची संधी मिळाली, त्या वेळेस जणू आनंदाश्रूत दाटले डोळ्यामध्ये, मनात वाटले माझ्या माउलीने मला प्रत्यक्षातच दर्शन दिले.
मनाला त्या क्षणी झालेला आनंद हा शब्दातीत आहे “तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम” हा संत गोरा कुंभाराचा अभंग जणू मनी ठाव धरू लागला. मला वाटले की आता पंढरपुरात माउलीचे प्रत्यक्ष दर्शन नाही मिळाले तरीही काही हरकत नाही मला माझा विठू राय भाळवणीतच भेटला. माउली चरणांवर नतमस्तक होताच
“आता कोठे धावे मन
तुझे चरण देखिलिया
भाग गेला शीण गेला
अवघा झाला आनंद”
हा तुकारामांचा अभंग मनी ठाव घेऊ लागला. योगायोग काय असावा हा अभंग मी पंढरीच्या वारीला जायच्या एक आठवडा आधीच एका कराओके ट्रॅक वर म्हटला होता. जेव्हा माउलीचे दर्शन झाले तेव्हा, १ आठवड्यापूर्वी जे मी गायलो होतो त्याचे प्रति रूपच मला त्या भाळवणीच्या विठ्ठल मंदिरात दिसू लागले. माऊलींना मी मनात म्हटले, “ मायबापा आता काही नको मजला तुमचे दर्शन झाले आणि मी कृतकृत्य झालो. मनात तुमच्या दर्शनाची जी आस होती ती पूर्ण झाली”. त्या दिवशी सायंकाळच्या दर्शनानंतर आणि अभंगाच्या कार्यक्रमानंतर “नीज दाटली डोळ्यात” असे वाटू लागले आणि रात्रीच्या विश्रांतीकरता पुन्हा आमच्या भाळवणीतल्या निवासस्थानी परत आलो.
बुधवार 10 जुलै 2019 :- भाळवणी ते इस्बावी पंढरपूर (साधारण अंतर 25 किलोमीटर)
अखेरीस साधारण 66 किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यानंतर तो दिवस आला ज्याची गेल्या तीन दिवसापासून किंबहुना एक आठवड्यापासून आम्ही वाट पाहत होतो. हा तोच दिवस होता ज्या दिवशी मलाच नव्हे तर आम्हा सर्वांना पंढरीत प्रवेश मिळणार होता. सकाळचे प्रातर्विधी आटपून सकाळी साधारण सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आम्ही आमच्या वारीतला शेवटचा परंतु तितकाच मोठा टप्पा सुरू केला. बुधवारी महाराजांची पालखी श्री रूपसेन इनामदार (गार्डी) यांचे घरी रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी आरती व नाश्ता करून साधारण आठ वाजण्याच्या सुमारास मार्गस्थ झाली. आमच्या प्रवासातला आमचे वैशिष्ट्य असे होते की आज भक्तजनांचे खरे दर्शन आम्हाला पंढरपूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाखरी या गावापासून सुरू होणार होते.
परंतु तत्पूर्वी आम्हाला 20 किलोमीटरचा बराच मोठा टप्पा पूर्ण करायचा होता मग काय पंढरीत पोहोचणार या आनंदाने भारावून गेलेले आमच्या दिंडीतील सर्व वारकरी नाम घोष करू लागले, भजने म्हणू लागले. सकाळी भाळवणी हून निघालो तेव्हा भाळवणीतच असणाऱ्या शाकंभरी देवी चे दर्शन घेतले . देवीला आमचा प्रवास सुखरूप व्हावा आणि सर्वांना सद्बुद्धी द्यावी म्हणून विनंती केली आणि मग पाउले चालती पंढरीची वाट हे सुप्रसिद्ध गाणं मनी येऊ लागलं नेहमीसारखेच आम्ही वाट पादाक्रांत करत रस्त्यात नेहमी सारख्या अनेक दिंड्या दिसू लागल्या. याच दिंड्यांमध्ये दोन महिला वारकऱ्यांनी विशेष लक्ष वेधले.
काय प्रेम आहे त्या विठुमाऊली करता वय, आर्थिक परिस्थिती अंतर अशी कोणतीही मर्यादा न राखता फक्त त्या विठू माउलीचे दर्शन मिळावे किंवा सावळ्या विठ्ठलाची फक्त एक झलक पाहायला मिळावी याकरिता मैलोनमैल चालत पंढरी चा प्रवास पूर्ण करतात. सर्वांना चालण्याची आणि भक्तीची प्रेरणा देणारी ती ईश्वरी शक्तीच आहे. जिचे काम हे परिसासारखे असून अनेक भाविकांना सोन्यात रूपांतर करण्याची शक्ती त्यात आहे. दिवसभराचा पायी प्रवास सुरू असताना दुपारी 12 ते 3 या वेळेत नावडे वस्ती येथे भजन, भोजन व विश्रांती झाली. भोजन व विश्रांती नंतर आमची आगेकूच ही सुरूच राहिली. आता पंढरपूरचे अंतर फक्त सात किलोमीटरवर येऊन राहिले होते.
पंढरपूर जसे जसे जवळ येऊ लागले तसे तसे देहू आणि आळंदीहून येणाऱ्या वारकरी मधील बरेच ट्रक पंढरपूरच्या दिशेने येऊ लागले आणि लवकरच त्याचे रूपांतर ट्रॅफिक जाम मध्ये झाले. महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी चोखंदळपणे पार पाडत लवकरच वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. साधारण दोन किलोमीटर अंतर पूर्ण झाले आणि मग वाखरी हे गाव आले
वाखरी ते पंढरपूर अंतर पाच किलोमीटर
वाखरी हे एक असे गाव आहे जेथे पुण्याहून वेगवेगळ्या मार्गाने आळंदी आणि देहूच्या ज्ञानोबा माउली आणि तुकोबा माउली यांच्या पालख्या एकाच वेळी एकत्र येतात. काय देवाची किमया आहे, कुठेही मोबाइलचा वापर न करता, संदेश वाहकांचा वापर न करतासुद्धा दोन्ही पालख्या एकत्र येतात तेही जवळपास एकाच वेळी. येथेच ज्ञानोबा आणि तुकाराम माउलीच्या पालखीचा एक भव्यदिव्य रिंगण सोहळा सुद्धा होतो. वाखरी मधील प्रवेशानंतर वैष्णवांची रीघ दिसू लागली. वाखरी मध्ये आल्यावर वैष्णवांची गर्दी खूप जास्त असल्याने आम्ही वारकरी एकमेकांचा हात धरून चालत होते. गर्दीत जर कोणाचा हात सुटला तर त्या व्यक्तीला भेटणे थोडेसे कठीणच होते लोक जास्त असल्याने बऱ्याचदा मोबाईल नेटवर्क जाम झालेली असते समोरील व्यक्ती फोन जरी लागला तरी आवाज नीट ऐकू येत नाही. एकंदरीत काय तर नेहमी एकमेकांच्या सोबत एकमेकांना धरून चालणे हाच एक संदेश हा विठू माउली सर्वांना देत असतो. एक गोष्ट वैशिष्ट्याने नमूद करावीशी वाटते कधीही कोणत्याही दिंडीत आपण शिरू नये कारण दिंडीमध्ये शिरल्यानंतर दिंडीतील वारकऱ्यांच्या चालण्याच्या वेगात आपण बरेच पुढे जाऊ शकतो बरंच पुढे गेल्यानंतर आपल्या सोबत आपल्या दिंडीत असलेल्या वारकऱ्यांना भेटणे हे कठीण जाऊ शकते.
वाखरी ला सुद्धा आम्हाला वरूणराजाने गाठले, गाठले काय तर झोडपूनच काढले. आमच्यापैकी काही वारकऱ्यांना पायात सारखे चालल्यामुळे गोळा आल्यासारखे वाटू लागले त्यामुळे आडोशाला थांबल्यावर थोडीशी मी त्यांच्या पायाला मालीश करून दिली आणि पायाचा गोळा नीट झाल्यानंतर आणि पुन्हा मार्गस्थ झालो. अखेरीस इसबावी मठ जिथे श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची दिंडी थांबणार होती तेथे आम्ही पोहोचलो आणि आमच्या आनंदाला पंढरीत पोहोचल्या मुळे पारावार राहिला नाही.
आमच्या दिंडीची राहायची सोय इसबावीत महाराजांच्या पालखीच्या जवळच केली होती थोड्या वेळ विश्रांती केल्यानंतर आम्ही पंढरीनाथाच्या दर्शनाकरता गेलो राहायचे ठिकाण म्हणजेच इसबावी मठ आणि श्री विठोबाचे मंदिर हे अंतर साधारण ५ किलोमीटर होते ध्वजधारी वैष्णव आणि वारकरी यांच्या गर्दीमुळे पायी चालणे देखील थोडेसे अवघड जात होते वाहतूक पोलिसांनी पंढरपुरातील स्थानिक वाहनांना पास दिला होता त्या वाहनांव्यतिरिक्त इतर बाहेरील वाहनांना प्रवेश हा शहराच्या रस्त्यात वर्ज्य होता त्यामुळे मंदिरापर्यंतचा प्रवास हा पायीच पूर्ण करावा लागणार हे निश्चितच होते पायी चालताना पंढरपुरात, जवळील गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा जेवणाचे खाण्याचे चहाचे स्टॉल लावले होते. त्या सर्वांमधून वाट काढत पुढे चालताना बर्याचवेळा अडथळे येत होते देव हा भक्ताच्या भक्तीची थोडीफार का असेना पण परीक्षा पाहत असतो काहीसे असेच त्या वेळेस वाटत होते. परंतु अखेरीस ५ किलोमीटरचे अंतर चालल्यानंतर संत नामदेव महाद्वार दिसले आणि विठ्ठल-रुक्मिणीचे रूप दिसले ते लाइटिंग च्या रूपात.
तेथे पुढे गेल्यावर रुक्मिणीच्या देवळाचे आणि विठ्ठलाच्या देवळाचे शिखर दर्शन घेतले असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी विठू माउली कळसावर येऊन आपल्या भक्तांची पाहणी करतो आणि त्यांना दर्शन देतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी पंढरपुरात शिखर दर्शनाचे विशेष महत्त्व आहे आम्ही शिखर दर्शनाकरिता गेलो त्याचे प्रमुख कारण म्हणजे पंढरपुरात गर्दी खूप जास्त होती आम्ही दर्शनाला गेलो तो दिवस हा एकादशीचा नव्हता तरीही शिखर दर्शन केले कारण त्या दिवशी मुख दर्शनाकरिता साधारण दोन ते तीन किलोमीटर लांबीची रांग होती आणि चरण दर्शनाकरिता साधारण सात किलोमीटर लांबीची रांग होती आलेल्या थकव्यामुळे आम्ही रांगेत न लागता शिखर दर्शनाचा लाभ घेतला. भाळवणी ला विठू माउली च्या चरणावर डोकं ठेवण्याची संधी मिळाल्यामुळे विठू माउलीचे पंढरपुरात मिळालेले शिखर दर्शन हेदेखील आल्हाददायकच होते.
दर्शन पूर्ण झाले आणि आमची पाउले वळली ती पुंडलिकाच्या मंदिराकडे चंद्रभागेच्या किनारी असणाऱ्या पुंडलिकाच्या मंदिरात देखील तितकीच गर्दी होती. त्यांचे दर्शन झाले आणि मग माय चंद्रभागेचॆ स्नान पूर्ण केले. स्नान पूर्ण झाले आणि मग आम्ही परतीची वाट धरली ती इस्बावीला. आम्हाला दशमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 11 जुलै 2019 ला परत मुंबई करता निघायचे होते. रात्री इस्बावी मठ येथे आल्यावर आम्ही पंढरपुरातला आराम केला व सकाळी गुरुवारी 11 जुलै 2019 ला साधारण साडे सातच्या सुमारास आम्ही सोलापूरच्या एसटी जिथे मिळतात तेथे जाऊ लागलो. अंदाजे एक तास पायी आणि बाइक वर प्रवास केल्यानंतर आम्हाला सोलापूरची एसटी मिळाली. सोलापूर हून आमची दुपारी साडेबारा वाजता ची मुंबई करता ट्रेन होती ज्याने आम्ही रात्री मुंबईत परत येणार होतो.
पंढरपूर ते सोलापूर हे साधारण 75 किलोमीटर अंतर आहे. सर्वसाधारणपणे हे अंतर पूर्ण करायला एसटीला एक ते दीड तास लागतो परंतु वारीच्या दिवशी किंवा वारीच्या काळात पंढरपुरात गर्दी खूप जास्त असल्यामुळे, पंढरपूर हून सोलापूर करता सुटणारी एसटी ही भीमा स्टँड जवळ केली होती. भीमा स्टँड ते मुख्य एसटी स्टँड हे अंतर साधारण चार ते पाच किलोमीटर आहे. पंढरपुरातली गर्दी पाहता आपल्या हातात व्यवस्थित वेळेच मार्जिन ठेवून घरून निघणे हे कधीही चांगले.
वारीच्या दिवसात पंढरपूर पासून मुंबई-पुणे-सोलापूर इत्यादी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्या ह्या मुख्य स्टँड पासून थोड्या अंतरावर म्हणजेच गावाच्या वेशी बाहेर उभ्या असतात. पंढरपूर शहरात वेशीबाहेर असणाऱ्या एसटी स्टँड पर्यंत रिक्शाला भाडे आकारणी साधारण तीनशे ते चारशे रुपये असते. गर्दी जास्त असल्याने रिक्शाला भाडे आकारणी थोडी जास्त असते, परंतु गर्दीत स्वतःला पायी वाट काढणे (तेही सामाना सोबत) बरेच कठीण असते त्यामुळे पंढरपुरात एकादशीला थांबणार असल्यास एकादशी-द्वादशी करूनच निघणे जास्त चांगले, कारण द्वादशी नंतर गर्दी ओसरण्यास सुरू होते. थोडी गैरसोय करायची नसेल तर दशमीला निघणे सुद्धा चांगले. अर्थात हा निर्णय सर्वस्वी वैयक्तिक आहे. एकादशीच्या दिवशी दर्शनाकरिता झालेल्या गर्दीमुळे बरेचदा २४ ते २५ तास चरण दर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागते. इतका वेळ रांगेत उभे राहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याने आपल्या सोयीनुसार निर्णय घेणे कधीही चांगले.
महाराजांच्या पालखीचे दिनांक 11 जुलै 2019 रोजी सकाळी चंद्रभागा स्नान झाले नंतर सायंकाळी पाच ते सात वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण व सर्व संतांच्या पालखी चे दर्शन घेण्याचा कार्यक्रम इस्बावी येथे होता.
शुक्रवार दिनांक 12 जुलै 2019 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पुन्हा चंद्रभागा स्नान झाले. दुपारी 11 ते 12:30 ला येशील भाऊ देशमुख यांचे प्रवचन सेवा झाली, मग दुपारी साधारण अडीचच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू झाले. सायंकाळी चार ते पाच वाजता श्री भाईनाथ महाराज समाधी, वेळापूर यॆथॆ दर्शन, भजन झाले आणि हे सर्व करून सायंकाळी साधारण साडेसहा वाजता दिंडीचे नातेपुते येथे आगमन झाले आणि गोंदवले ते पंढरपूर या पायी वारी-२०१९ चे समापन झाले.
पंढरीनाथ महाराज की जय
गोंदवले ते पंढरपूरच्या वारीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी:-
१. पायी वारीला जाणार असल्यास गोंदवले संस्थानी दूरध्वनी मार्फत नोंदणीची चौकशी आवर्जून करणे.
२. आपल्या गोळ्या, औषधे, रेनकोट, टोपी व इतर आवश्यक गोष्टी सोबत ठेवणे.
३. वारीमध्ये ताट आणि वाटी सोबत आवर्जून आणणे.
४. कपडे अधिक अगदी मोजकेच ठेवावे आणि शक्य असल्यास आधी वापरलेले कपडे ठेवावे नवीन कपडे व चपला या त्वचेवर घासल्या जातात आणि त्यामुळे त्वचेला त्रास होऊन छाले आणू शकतात जे पुढचा पायी प्रवास कठीण करतात.
५. आमचा या वर्षीच्या वारीतला खर्च हा प्रत्येकी साधारण ३,००० पर्यंत आला.
महाराजांच्या पालखी सोबत हा खर्च थोडा कमी असतो, पण आम्ही कधीकधी लॉज, गेस्ट हाउस मध्ये स्वतंत्र राहिल्यामुळे होणारा खर्च हा थोडा जास्त आला.
तो सर्व मिळून ४ दिवसांसाठी, साधारण ३,०००/- पर्यंत खर्च आला.
आशा करतो की हा लेख वाचकांना जरूर आवडला असेल, सर्व वाचकांना नेहमीच भरभराटी मिळावी ही पंढरीनाथाला प्रार्थना