टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वामागून अश्व दौडले आणि माउलीऽऽ माउलीऽऽ नामाचा जयघोष सुरू झाला. अशा अल्हाददायक व उत्साही वातावरणात श्री संत ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आयुर्वेद सिटी येथे पार पडले. सायंकाळी हा सोहळा तरडगाव मुक्कामी विसावला.
लोणंद मुक्कामी कोकण, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. दीड दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी 1 वाजता माउलींचा पालखी सोहळा तरडगाव मक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारी 2 वाजता कापडगाव येथे सोहळ्याचे फलटण तालुकावासियांनी स्वागत केले. उभ्या रिंगणासाठी दुपारी 3.30 वाजता अश्व आयुर्वेद सिटी येथे दाखल झाले. चोपदारांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी चार वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले. अश्व 27 दिंड्या पार करून रथाच्या दिशेने धावत गेले. समोर स्वाराचा अश्व तर मागे माउलींचा अश्व दौडत होता. वारकर्यांच्या मुखी माउलीऽऽ माउलीऽऽ नामाचा जयघोष आणि साथीला टाळ, मृदंगाचा गजर सुरू होता. अशा वातावरणातच स्वाराचा व माउलींचा अश्व मागे 20 दिंड्यांपर्यंत जाऊन पुन्हा माउलींच्या रथाकडे निघाले. वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत दोन्ही अश्व माउलींना प्रदक्षिणा मारून व नारळ प्रसाद घेऊन गर्दीतून वाट काढीत सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचले. रिंगण सोहळा झाल्यानंतर हा सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला.
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगाव, पर्हार खुर्द, हिंगणगाव, राहुडी, माळेवाडी, शिंदेळा आदी गावातील हजारो भाविक उपस्थित झाले होते. लोणंद ते तरडगाव या वाटचालीत विविध ग्रापंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माउलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगाव येथे सायंकाळी हा सोहळा पोहोचला. त्यावेळी ग्रापंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. येथे सोहळ्याचा एक दिवस मक्काम असून आज (गुरुवार) हा सोहळा फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.