इस्रोमध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे का? त्यासाठी काय करायला हवं?

सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (19:20 IST)
चंद्रयान-3 च्या यशाने भारताने अंतराळ क्षेत्रात आणखीन एक दिमाखदार पाऊल टाकलं आहे. आजवर जिथे कोणताही देश पोहोचू शकला नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भारताच्या विक्रम लॅन्डरने पाऊल टाकलं आणि त्या लॅन्डरमधून उतरून प्रज्ञान रोव्हरने चंद्राचा फेरफटका मारायलाही सुरुवात केली.
 
आता सहा चाकी रोव्हर चंद्रावर फिरून त्याला मिळालेली माहिती पृथ्वीवर पाठवेल आणि याद्वारे जगाच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
 
चंद्रयान आकाशात प्रक्षेपित केल्यापासून ते विक्रम लॅन्डर चंद्राच्या जमिनीवर उतरतानाचे व्हिडिओ देशभरातील शैक्षणिक संस्था आणि शाळांमध्ये दाखवले गेले.
 
विक्रम लॅन्डरमधून प्रज्ञान रोव्हर उतरत असतानाच व्हिडिओला देशभरातील तरुणांनी अनेकदा रिप्ले करून पाहिलं.
 
भारताने अंतराळ क्षेत्रात मिळवलेल्या या यशाचं श्रेय भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रोमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना जातं. चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं अंतराळातलं कुतूहल वाढलं नसत तरच नवल आणि कुतूहलाने जन्म दिला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनण्याच्या इच्छेला.
 
मात्र तुम्हाला हे माहितीय का की व्यवस्थित नियोजन केलं तर विद्यार्थ्यांना सहजपणे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करता येतं.
 
आता जर तुम्हाला खरोखर इस्रोमध्ये काम करायचं असेल, तर त्यासाठी नेमकी कोणती तयारी केली पाहिजे? या तयारीचं नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे? या बातमीतून तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.
 
इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनण्यासाठी नेमकं काय शिकावं लागतं?
चंद्रयान-1 प्रकल्पाचे संचालक आणि शास्त्रज्ञ मायलास्वामी अन्नादुराई याबाबत सांगतात की, "ज्या विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करायचं आहे त्यांनी विज्ञान आणि गणिताचा मन लावून अभ्यास केला पाहिजे.
 
गणित हा यासाठी करण्यात येणाऱ्या तयारीचा पाया आहे. त्यामुळे बीजगणित आणि भूमितीचा पक्का अभ्यास केला पाहिजे. पुस्तकांमध्ये दिलेली माहिती तर महत्वाची आहेच पण पुस्तकांच्या पलीकडे जाऊन यासंदर्भातला अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे."
 
ते पुढे सांगतात की, "फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा, तुम्हाला तुमचे प्रश्न स्वतःच तयार करावे लागतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी प्रश्न तयार करण्याची, उत्तरे शोधण्याची ही सवय अगदी लहानपणापासूनच लावून घेतली पाहिजे."
 
एखादी गोष्ट बनवल्याचा आनंद मिळणं हा शास्त्रज्ञ होण्याचा एक मूलभूत पाया आहे, असं मायलास्वामी अन्नादुराई यांचं मत आहे.
 
"ज्या प्रमाणे एखादा चित्रकार त्याचं चित्र काढत असतो, ज्याप्रमाणे एखाद्या कवीला कविता करून आनंद मिळतो अगदी त्याचप्रमाणे वैज्ञानिकालासुद्धा एखादी गोष्ट तयार करण्याची इच्छा असायला हवी. "
 
इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठीच्या पायऱ्या
खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या क्षेत्रांशी संबंधित योग्य ज्ञान आणि कौशल्ये असलेल्या उमेदवारांची इस्रोकडून भरती केली जाते. यासाठी लागणारं शिक्षण आणि तयारीचा हा आढावा.
 
1. बारावीमध्ये विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीन विषयांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. त्यांच्याकडे गणिताबरोबरच भौतिकशास्त्रामध्ये योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे.
 
2. बारावीमध्ये 75% पेक्षा जास्त गुण मिळवल्यानंतर जेईई ऍडव्हान्स आणि जेईई मेन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला पाहिजे.
 
विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, एरोस्पेस, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, भौतिकशास्त्र, रेडिओ आणि इतर संबंधित क्षेत्रांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये बीटेक किंवा बीई करणं आवश्यक आहे.
 
3. BTech/BE पदवी पूर्ण केल्यावर, ISRO Centralized Recruitment Board (ICRB) या संस्थेमार्फत घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, किंवा मेकॅनिकल किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रात बीटेक किंवा बीई पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.
 
यासोबतच त्यांना 65% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क किंवा 6.8 चा CGPA असणं गरजेचं आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी आणि मुलाखत द्यावी लागते.
 
4. तसेच, एखाद्याने संबंधित स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण (एमएससी, एमई किंवा एमटेक) आणि पीएचडी पूर्ण केली असल्यास, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनत येतं.
 
5. जिओफिजिक्स, जिओइन्फॉरमॅटिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, उपयोजित गणित अशा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इस्रोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
 
6. इच्छुक उमेदवार ISRO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलोम्हणून देखील काम करू शकतात. यासाठी निवड झाल्यावर वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये शास्त्रज्ञ किंवा अभियंता म्हणून काम करता येतं.
 
अंतराळ संशोधन फक्त इस्रोमध्येच होतं असं नाही
उच्चशिक्षणाची निवड करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञान किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील एखादा अभ्यासक्रम अगदी काळजीपूर्वक निवडला पाहिजे, असं शास्त्रज्ञ मायलास्वामी अन्नादुराई म्हणतात.
 
"विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतील अभ्यासक्रमाची निवड केल्यास शास्त्रज्ञ बनता येऊ शकतं. तुमच्या क्षमता आणि आवड कोणत्या अभ्यासक्रमाच्या जवळ जाते याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. जेईईची परीक्षा देऊन तुम्ही आयआयटी सारख्या संस्थांमध्ये बी.ई. किंवा बी. टेक. सारखे कोर्स करू शकता."
 
तिरुवनंतपुरममधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चालवले जाणारे एक व्हर्च्युअल विद्यापीठ आहे. या विद्यापीठात B.Tech, M.Tech, M.Sc, Ph.D यांसारखे अभ्यासक्रम शिकवले जातात.
 
इतरही महाविद्यालयांमध्ये शिकत असला तरी तुम्हाला शास्त्रज्ञ बनण्याचं स्वप्न पाहता येतं. मात्र अगदी लहान असल्यापासूनच जर IIT आणि IISC सारख्या संस्थांमध्ये शिकण्याची तयारी केली तर विद्यार्थ्यांसाठी शास्त्रज्ञ बनण्याचा मार्ग अगदी सोपा होतो.
 
शास्त्रज्ञ असणारे आर. वेंकटेशन म्हणतात की शास्त्रज्ञ होण्यासाठी कोणतेही विशेष अभ्यासक्रम नाहीत. ब्रेकथ्रू सायन्स क्लबच्या माध्यमातून आर. वेंकटेशन हे विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित माहिती आणि प्रशिक्षणं देत असतात.
 
ते म्हणतात की, "इस्रोमध्ये काम करणाऱ्या लोकांनी कोणत्याही एका ठराविक अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला नसतो. बी.टेक. झाल्यानंतर एम. टेक. सारखे अभ्यासक्रम पूर्ण करून लोक इस्रोमध्ये काम करायला सुरुवात करतात.
 
एखाद्या प्रकल्पावर नियुक्त झाल्यांनतर त्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण ते घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमांचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचं गणित पक्कं असणंदेखील महत्वाचं आहे."
 
त्यांचं असंही म्हणणं आहे की, जर का तुम्हाला अंतराळावर संशोधन करायचं असेल तर ते संशोधन फक्त इस्रोमध्येच केलं जाऊ शकतं असं नाहीये.
 
“चेन्नईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, सागा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस यासारख्या संशोधन संस्थाही आपल्या देशात आहेत.
 
या संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केलं जातं. देशभरातील वैज्ञानिक इथे काम करत असतात. या संस्थांमध्ये काम करणारे वैज्ञानिक मोठ्या प्रमाणावर अंतराळ संशोधन करत असतात.
 
विज्ञानक्षेत्रातील नवीन निर्माण झालेल्या किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या संस्थांमध्ये केला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संशोधन करून शास्त्रज्ञ व्हायचं आहे त्यांनी इस्रोच्या पलीकडे जाऊन या संस्थांचे पर्यायही तपासले पाहिजेत."
 
इस्रोतर्फे शास्त्रज्ञांची निवड नेमकी कशी केली जाते?
याबाबत माहिती सांगताना मायलास्वामी अन्नादुराई म्हणतात की, "इस्रोचे स्वतःचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जर तुम्हाला जेईईमध्ये चांगले गुण मिळवता आले तर याच विद्यापीठातून शिकण्याचा पर्याय यासाठी निवडला पाहिजे.
 
तुम्हाला किती मार्क पडले आहेत त्यावरून विषयांची निवड करू शकता. या विद्यापीठात शिकत असताना तुम्हाला इस्रो ही संस्था नेमकी काय काम करते? या संस्थेमध्ये कोणकोणते विभाग आहेत आणि ते कोणत्या प्रकारचं काम करतात याची माहिती मिळेल. "
 
"तुम्ही शिक्षण घेत असतांना चांगले गुण मिळवले आणि तुमची शैक्षणिक प्रगती उत्तम असेल तर इस्रोमध्ये काम करण्यासाठी देखील तुमची निवड होऊ शकते. इस्रोमध्ये नोकरी मिळवण्याचा आणि संशोधन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे."
 
इस्रोद्वारे नेहमी वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी परीक्षा घोषित केल्या जातात, त्या परीक्षा उत्तीर्ण होऊनही तुम्ही इस्रोमध्ये सहभागी होऊ शकता.
 
संपूर्ण समर्पण आणि चिकाटी आवश्यक आहे
मायलास्वामी अन्नादुराई म्हणतात की, "इस्रोमध्ये निवड झाल्यानंतर तुमची ज्या विभागात नियुक्ती झाली आहे, तेथील कौशल्ये तुम्ही शिकली पाहिजेत. तुम्हाला देण्यात आलेल्या कामापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन तुम्हाला काम करता आलं तर तिथे जास्तीत जास्त शिकता येतं.
 
"तुम्हाला दिलेलं काम तर तुम्हाला उत्तम पद्धतीने केलंच पाहिजे. मात्र तुम्ही इतरही कामं करत असाल तर वरिष्ठांची नजर तुमच्यावर पडू शकते.
 
ते असा विचार करू शकतात की हा माणूस चांगलं काम करतो आहे तर याला अधिकची जबाबदारी द्यायला काहीही हरकत नाहीये."
"इथे एका गोष्टीची मात्र आवर्जून नोंद घेतली पाहिजे आणि ती म्हणजे अनेकांचं असं म्हणणं असतं की त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील काम त्यांना तिथे देण्यात आलेलं नाही, त्यामुळे अशी लोकं बराच काळ तिथेच अडकून असतात.
 
मात्र इस्रोमध्ये कोणत्याही विभागात मन लावून आणि समर्पित होऊन काम केलं तर यशस्वी होता येतं."
 
भविष्यकाळात शास्त्रज्ञांची गरज आहे का?
मायलास्वामी अन्नादुराई म्हणतात की, "भविष्यकाळात शास्त्रज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे."
 
"केवळ इस्रोच नाही तर खाजगी कंपन्यादेखील अंतराळ संशोधनामध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. कुलशेखरपट्टणम येथील रॉकेट लॉन्च पॅडचा वापर खासगी कंपन्या करणार आहेत.
 
त्यामुळे येणाऱ्या काळात शास्त्रज्ञांना नक्कीच मागणी असेल. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नेमक्या संधी ओळखल्या पाहिजेत. नोकरीसोबतच शास्त्रज्ञ स्वतःच्या उद्योगदेखील सुरु करू शकतात."
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती