शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचदरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
यशवंत जाधव, चे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.
यशवंत जाधव यांनी दावे फेटाळले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री (matoshree) आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.