शिर्डीत दर्शनासाठी लागणाऱ्या पासबाबत महत्वाची बातमी!

सोमवार, 28 मार्च 2022 (08:13 IST)
शिर्डीत दर्शनासाठी लागणाऱ्या पासबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
भाविकांना त्रासदायक असलेले बायोमेट्रिक दर्शन पास बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय साईसंस्थानने घेतला आहे.
 
झटपट व व्हीआयपी दर्शन पासेस सुरू राहणार आहेत.
 
अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शनिवारी (दि.२६) हा निर्णय घेण्यात आला.
 
साईसंस्थानकडून भाविकांना प्रसादरूपाने देण्यात येणाऱ्या बुंदी लाडूचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तुपाची गुणवत्ता सांभाळण्यासाठी नियमावलीत बदल करून खरेदी प्रक्रिया राबवण्यात येईल.
 
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुंनी महाद्वारे उभारण्याचा संस्थानचा मानस आहे. यासाठी संबंधित यंत्रणांकडून परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार अाहे. भाविकांचे येथील वास्तव्य सुरक्षित व आनंददायी करण्यासाठी प्राधान्य असल्याने भाविकांना त्रास देणाऱ्यांचा संस्थान व पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात येईल, असे अध्यक्ष काळे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, जयंत जाधव, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, अ‍ॅड. सुहास आहेर, सचिन गुजर, सीईओ भाग्यश्री बानायत आदी उपस्थित होते.
 
सत्यनारायण, अभिषेक १ एप्रिलपासून सुरु:
कोविडमुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सत्यनारायण, अभिषेक पूजा १ एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. मंदिर परिसरातील बॅरिकेड‌्स हटवण्यात येतील. ग्रामदैवतांचे दर्शन व द्वारावती भक्तनिवासच्या समोरचा बगिचा खुला करण्यात येणार आहे.
 
रामनवमी उत्सव होणार धूमधडाक्यात:
कोविडचे निर्बंध हटल्याने यंदाची रामनवमी धूमधडाक्यात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. पदयात्रींनी व भाविकांनी आनंदाने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. रामनवमी उत्सवासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील २१ लाख रुपये ग्रामस्थांच्या यात्रा समितीला कार्यक्रमांच्या आयोजनासाठी देण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती