यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरच्या हत्येनंतर तणाव का निर्माण झालाय?

शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (18:50 IST)
नितेश राऊत
UGC
 यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरच्या हत्येच्या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी आणि परीक्षाविधीन डॉक्टरांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन सुरू केलं आहे.
 
10 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली होती. मृत डॉक्टर अशोक पाल महाविद्यालय परिसरातील ग्रंथालयातून वासतीगृहकडे जाताना दोन आरोपींनी रस्त्यात अडवून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले होते. काही तरुणांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींना अटक केली आहे. अशोक पाल यांचा तीन महिन्यांपूर्वी अटक झालेल्या या दोन संशयीत आरोपींसोबत वसतीगृह परिसरात वाद झाला होता.
 
मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका करण्यावरुन त्यांच्यात मारहाणही झाली होती. त्यातूनच डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत यांनी दिली.
दरम्यान, शिकाऊ डॉक्टरची कॉलेज परिसरात हत्या झाली. त्यावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. कॉलेज आणि परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनं केली आहे.
 
प्रभारी अधिष्ठातांचा राजीनामा
या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता मिलिंद कांबळे राजीनामा दिला आहे. महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या हत्येच्या अनुषंगाने राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
 
मात्र, इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. अशोक पाल यांना न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील, असं संघटनेचे सदस्य डॉ. प्रेमळ नवरंगे म्हणाले.
त्याचबरोबर विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी डॉक्टरही संपावर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर परवापासून सेंट्रल मार्डचे महाराष्ट्रातील शासकीय डॉक्टर संपावर जातील, असाही इशारा देण्यात आला आहे.
 
अद्याप आरोपपत्र नाही
अटक करण्यात आलेले आरोपी संशयीत आहेत. अद्याप त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. त्यामुळं मारेकऱ्यांना अटक करेपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणासाठी महाविद्यालय प्रशासन जबाबदार असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
यापूर्वी कॉलेज प्रशासनास तसंच पोलीस प्रशासनाकडेही वारंवार मागण्या आणि तक्रारी केल्या. तरीही त्याकडं दुर्लक्ष करुन दखल घेतली गेली नसल्याचं, आंदोलकांचं म्हणणं आहे.
 
'मार्ड' संघटनेच्या मागण्या
1) अशोक पाल यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि जलदगती न्यायालयामार्फत डॉ. अशोक पाल यांना लवकरात लवकर न्याय मिळावा.
 
2) डॉ. अशोक पाल गरीब आणि होतकरू विद्यार्थी होते. शिवाय घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असल्यानं कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम (Compensation) देण्यात यावी. (राज्य सरकार आणि महाविद्यालय प्रशासनाकडून)
 
3) अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कॉम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट, सुरक्षा रक्षक, सी. सी. टीव्ही कॅमेरे (नाईट व्हीजन), कॅम्पसमध्ये वाढलेले गवत आणि झाडंझुडपं यांची कापणी या उपाययोजना तत्काळ कराव्या. महाविद्यालय परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून, किमान उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
4) हॉस्पिटल अणि कॉलेज कॅम्पसमधील निवासी भाग वेगळे करणे, कॅम्पसच्या निवासी भागात कोणत्याही बाहेरील अनोळखी व्यक्तींना चौकशी शिवाय प्रवेश देऊ नये.
 
5) सर्व वार्डातील डॉक्टरांच्या रूममध्ये तातडीची दुरूस्ती करणे तसंच अपघातातील सर्व पुरूष आणि महिला डॉक्टरांसाठी स्वतंत्र आणि मुलभूत आणि अद्ययावत सोईसुविधायुक्त रूम असाव्यात.
 
6) वर्ग 1 ते 4 कर्मच्याऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या.
7) जुने आणि नवीन पद्युत्तर विद्यार्थ्यांचं तसंच पदविधर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक वसतीगृहामध्ये स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक (म.सु.ब.) यांची नेमणूक करण्यात यावी. तसंच वसतीगृह प्रमुखांकडून साप्ताहिक कामकाजाचा अहवाल मागविण्यात यावा. अहवालानुसार आवश्यक त्यावेळीच कार्यवाही करण्यात यावी.
 
8) महाविद्यालय परीसरामध्ये उपलब्ध असलेल्या मुलींचे, मुलांचे आणि पदयुत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहामध्ये जीवनरक्षक औषधी आणि साहित्य उपकरणे यांची उपलब्धता करून देण्यात यावी.
 
9) क्ष-किरणशास्त्र विभागांतर्गत असलेल्या क्ष-किरण उपकरणे तसंच सोनोग्राफी मशीन आणि सी. टी. स्कॅन सर्व नियमित आण अविरत कार्यरत ठेवण्यात याव्यात.
 
10) डॉ. मिलिंद कांबळे यांना अधिष्ठाता पदावरून बाजुला करावे आणि त्यांना नियुक्ती देण्यात येऊ नये. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.
 
अशा मागण्या मार्डच्या वतीने करण्यात आल्या असून, अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती