Weather Report : आज कोकणाला ऑरेंज अलर्ट

शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:47 IST)
मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला होता. कोकणातही पाऊस पडत असून शनिवारीदेखील संपूर्ण कोकणात (आॅरेंज अलर्ट) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने मुंबईत दुपारनंतर वेग पकडला. पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी घरांचा भाग पडला, ४ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या, तर १२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
 
शुक्रवारी सकाळपासून सुरू असणारा पाऊस मुंबईत रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात ५४.७८ मिलिमीटर तर पूर्व उपनगरात ४३.५६ व पश्चिम उपनगरात २६.२२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांनाही दिवसभर पावसाने झोडपून काढले.
 
मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन
गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथे २९ ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ३० आॅगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात ताशी ५५ किमी. वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
 
गणेशभक्तांची उडाली तारांबळ
शुक्रवारी सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असतानाच पाऊस दाखल झाल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, पावसामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग कमी झाला होता. शिवाय दिवसभर पाऊस पडत असलेल्या मुंबईतील रस्त्यांवर वर्दळदेखील कमी होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती