चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या

शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (17:55 IST)
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरमधून मनसेकडून खासगी गाड्या सोडण्यात आल्या. मुंबईत विविध भागांमधून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जवळपास २५० बसेसची व्यवस्था मनसेकडून करण्यात आली आहे. यादरम्यान मनसेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवाशांना प्रोटेक्शन कीट दिली जात आहे.  दादरमधून मनसे बस सेवेला प्रारंभ झाला आणि पहिली बस कोकणकडे रवाना झाली. हा उपक्रम मनसे आणि महापालिका कामगार सेनेच्या वतीने राबवण्यात आला आहे.
 
‘गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम अवस्था आणि नाराजी होती. कारण सरकारकडून त्यांना कोणतही ठोस उत्तर दिलं जात नव्हतं. एसटी बसेस जाणार आहेत की नाही? किती दिवस अगोदर जाणार आहेत? किती दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे?. जेव्हा सरकारकडून लोकांना योग्य उत्तर मिळतं नव्हतं त्यावेळेला मनसे नेहमी प्रमाणे पुढे धावून आली. त्यामुळे विविध भागांमधून कोकणवासियांसाठी मनसेकडून बसेस सोडल्या जात आहेत’, असं मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
 
‘जवळपास १० ते १५ बसेस दादरमधून सुटणार आहेत. उर्वरित बसेस ठाणे, बोरिवली, भांडूप अशा विविध भागातून सोडण्यात येणार आहे. २०० ते २५० बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी सोडण्यात येणार आहेत. बसमध्ये बसण्याची क्षमता ४८ ते ५० लोकांची असली तरी आम्ही २४ लोकांना एकाच बसमधून सोडले जात आहे’, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. या बसेस चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती