गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरात राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला आहे.
गाडी फोडताना संबंधितांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देतानाचे व्हीडिओमध्ये दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "माझ्या गाड्यांती तोडफोड करण्यात आली आहे. झेपणार नाही, पेलणार नाही असं जरांगे म्हणतात, त्याच्यातच हा कोड वर्ड आहे. गुन्हे मागे घ्या म्हणे. शोले स्टाईल टॉवरवर उभे राहतात, सर्व गुन्ह्यांची बेरीज बघता हे मोठं ठरवून केलेलं कारस्थान आहे."
सदावर्ते पुढे म्हणाले, "ज्या माणसामुळे पोलिस धारातीर्थी पडले, अशा जरांगेंना तत्काळ अटक करा, त्यांच्या मुसक्या बांधा, कारवाई करा."
मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगेंनी याप्रकरणी बोलताना म्हटलं, "काय प्रकार घडला ते आम्हाला माहिती नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे.
"अटकेच्या मागणीवर ते म्हणाले, मला अधिकृत काहीच माहिती नाही. कुणाच्या गाडीला धक्का लागलाय की लावलाय ते आम्हाला माहिती नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. ते तसंच चालूच राहणार आहे. आम्ही तोडफोडीचं समर्थन करत नाही."